IPL 2023 : अर्शदीप सिंगने आपल्या नावे केला नकोसा विश्वविक्रम!


22 एप्रिल रोजी आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध विकेट घेणारा अर्शदीप सिंग अचानक हिरो वरून झिरो झाला. पंजाबच्या या वेगवान गोलंदाजाची बुधवारी जोरदार धुलाई करण्यात आली. मोहालीत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने खराब गोलंदाजीच्या सर्व मर्यादा मोडल्या. अर्शदीप सिंगने इतकी खराब गोलंदाजी केली की 214 धावा करूनही त्याचा संघ मुंबई इंडियन्सकडून 7 चेंडूंपूर्वीच हरला. या पराभवादरम्यान अर्शदीप सिंगने असा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला, जो आश्चर्यकारक आहे.

खरं तर, अर्दशदीप सिंग हा T20 क्रिकेटच्या इतिहासात 4 पेक्षा कमी षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीप सिंगने मुंबई इंडियन्सविरुद्ध 3.5 षटकात 66 धावा दिल्या. यापूर्वी हा विक्रम बेन व्हीलरच्या नावावर होता, ज्याने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3.1 षटकात 64 धावा दिल्या होत्या.

अर्शदीप सिंगने मुंबईविरुद्ध 17.21 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. अर्शदीप सिंगची गोलंदाजी इतकी खराब होती की त्याला 23 पैकी 12 चेंडूत चौकार ठोकण्यात आले. अर्शदीप सिंगला एकूण 4 षटकार मारण्यात आले. याशिवाय अर्शदीप सिंगनेही दोन वाइड चेंडू टाकले.

गेल्या दोन सामन्यांपासून अर्शदीप सिंग महाग ठरत आहे. त्याने चेन्नईविरुद्ध 4 षटकात 37 धावा दिल्या आणि या वेगवान गोलंदाजाने मोहालीतच लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 54 धावा दिल्या. अर्शदीप सिंगने या मोसमात 10 सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत, परंतु त्याचा इकॉनॉमी रेट 9.80 आहे. या मोसमात अर्शदीप सिंग प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे, पण तो यादरम्यामनच अधिक महागडा ठरत आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध पंजाब किंग्जचा सामना हरल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाबने 10 पैकी 5 सामने जिंकले असून 5 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आता त्याचे 4 सामने बाकी असून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना किमान 3 सामने जिंकणे आवश्यक आहे. आता पाहावे लागेल की पंजाबचा संघ हे करू शकतो की नाही?