IPL2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना मिळाली भांडणाची शिक्षा


विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना एकमेकांसोबत भांडणे महागात पडले आहे. त्यांना एकमेकांशी भांडण करण्याची शिक्षा मिळाली आहे. दोघांमधील भांडण हाणामारीच्या मर्यादेपर्यंत पोहोचले नसले, तरी जे घडले, ते क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळातील कितीही मोठे खेळाडू असले तरी ते चांगले मानले जात नाही. हे थेट क्रिकेटच्या नियमांच्या विरोधात आहे. कोहली आणि गंभीरला याची शिक्षा झाली.

कोहली आणि गंभीर हे आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत आणि त्याची शिक्षा म्हणून त्याच्या मॅच फीमध्ये कपात करण्यात आली आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याची फी दोघांनाही मिळाली नाही. शिक्षा म्हणून त्याच्या मॅच फीमध्ये 100 टक्के कपात करण्यात आली आहे.

या मोसमात विराट कोहलीला मिळालेली ही तिसरी शिक्षा आहे, जी त्याच्या मागील दोन चुकांपेक्षा मोठ्या चुकीसाठी देण्यात आली आहे. यापूर्वी आयपीएल 2023 मध्ये, फाफ डू प्लेसिसच्या जागी आरसीबीचे कर्णधार असताना त्याला स्लो ओव्हर रेटसाठी दोनदा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र यावेळी भांडण झाल्याने शिक्षा अधिकच देण्यात आली आहे.

विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघेही आयपीएल आचारसंहितेअंतर्गत लेव्हल 2 च्या गुन्ह्यांसाठी दोषी आढळले. दोघांनीही आपली चूक मान्य केली, त्यानंतर त्यांची संपूर्ण मॅच फी कापण्यात आली. या दोघांशिवाय लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज नवीन-उल-हकही शिक्षेस पात्र ठरला आहे, त्याला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. नवीनची चूक अशी होती की तो कोहलीसोबत वाद घालत होता.

लखनऊ आणि बंगळुरू यांच्यातील सामना संपल्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यातील भांडण सुरू झाले. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटत असताना हा प्रकार घडला. यादरम्यान विराट आणि गंभीरमध्ये वाद झाला. वादाने तीव्र स्वरूप धारण केले, जे पाहून बाकीच्या खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला.

लढतीचे हे चित्र तसे नवे नाही. विराट आणि गंभीर याआधी 2013 च्या आयपीएलमध्येही भिडले होते. फरक एवढाच आहे की गंभीर तेव्हा केकेआरचा कर्णधार होता आणि आता तो मार्गदर्शक आहे. विराट कोहली तेव्हाही आरसीबीशी संबंधित होता आणि अजूनही आहे.