बॉक्‍स ऑफिसवर निघाली भाईची ‘जान’, सहाव्या दिवशी कमावले इतके कोटी


सलमान खानच्या मल्टीस्टारर चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’च्या सहाव्या दिवसाचे कलेक्शन खूपच निराशाजनक होते. चाहत्यांना हा चित्रपट फारसा आवडला नाही, त्याचा परिणाम कलेक्शनवरही दिसून येत आहे. प्रदीर्घ काळानंतर सलमानच्या पुनरागमनाबद्दल चाहते खूप उत्सुक होते, पण किसी का भाई किसी की जानची कथा आणि अभिनय काही विशेष दाखवू शकला नाही. ईदला रिलीज झाल्याचा काही फायदा नक्कीच झाला होता, पण 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सलमान खानला वीकेंडची वाट पाहावी लागणार आहे.

21 एप्रिल रोजी रिलीज झालेल्या ‘किसी का भाई किसी की जान’ने आतापर्यंत एकूण 90 कोटींचा गल्ला जमवला आहे. सॅकनिल्‍कच्‍या आकडेवारीनुसार, सलमानच्‍या चित्रपटाने 6 व्‍या दिवशी केवळ 5 कोटींची कमाई केली आहे. सलमान खानचे स्टारडम पाहता चित्रपटाच्या कमाईचे हे आकडे फारच कमी आहेत.

किसी का भाई किसी की जानने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 15.81 कोटींची कमाई केली आहे. मात्र, ईदमुळे चित्रपटाच्या कमाईत दुस-या दिवशी थोडीशी उसळी आली आणि चित्रपटाने 25.75 कोटींची कमाई केली. रविवारी तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 26.61 कोटींची कमाई केली. सोमवारपासून चित्रपटाच्या कमाईत घट झाली. चौथ्या दिवशी चित्रपटाने केवळ 10.71 कोटी कमावले, तर पाचव्या दिवशी 6.12 कोटींची कमाई केली.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सलमान खानच्या चित्रपटाला मेट्रो शहरे आणि मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये चाहते मिळत नाहीत, परंतु किसी का भाई किसी की जान अजूनही छोट्या शहरांमध्ये आणि सिंगल स्क्रीनवर चांगली कमाई करत आहे. मात्र, 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्यासाठी भाईजानला अद्याप वीकेंडपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 1 मे रोजी येणाऱ्या लाँग वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊ शकते.