तुम्ही तुमचे पैसे, महत्त्वाची कागदपत्रे किंवा दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवता का? जर उत्तर होय, असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. चोरी किंवा हरवण्याच्या भीतीने अनेकदा लोक आपल्या जीवनावश्यक वस्तू आणि पैसे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. लॉकरमध्ये आपले सामान सुरक्षित राहील, असे त्यांना वाटते. पण, कधी कधी लॉकरमध्ये ठेवलेले सामानही गायब होते किंवा खराब होते. अशा स्थितीत बँका त्याची जबाबदारी घेण्यास नकार देतात. तुम्हीही लॉकर घेण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी तुम्हाला आरबीआयचा लॉकर नियम जाणून घ्यावा लागेल.
बँक लॉकरमध्ये पैसे ठेवण्यापूर्वी RBI चा हा नियम जाणून घ्या, नाहीतर होईल अडचण
आरबीआयने लॉकर्ससाठी काही नियम केले आहेत. ग्राहकांच्या वस्तूंची सुरक्षा आणि त्यांच्या सोयी लक्षात घेऊन हे नियम करण्यात आले आहेत. बँक लॉकरसाठी आरबीआयचे काय नियम आहेत ते जाणून घेऊया…
RBI ने यावर्षी बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. नव्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीने बॅंकेच्या लॉकरमध्ये सामान ठेवले आणि त्याचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी बॅंकेची असेल. लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रक्कम ग्राहकाला देण्यास बँक बांधील असेल. दुसरीकडे आग, दरोडा किंवा कोणत्याही प्रकारे ग्राहकाच्या लॉकरचे नुकसान झाल्यास बँक त्याची भरपाई करेल.
जर तुम्हाला बँकेत लॉकर घ्यायचे असेल, तर तुम्हाला प्रथम ज्या शाखेत तुमचे लॉकर उघडायचे आहे तेथे जावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तेथे अर्ज करावा लागेल. तुम्हाला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर लॉकरचे वाटप केले जाते. अर्ज दिल्यानंतर जर तुमचे नाव बँकेच्या प्रतीक्षा यादीत आले, तर तुम्हाला लॉकर दिले जाते. त्यासाठी तुम्हाला वार्षिक काही भाडेही आकारले जाते.