बनावट एजंट कर्ज वसुलीसाठी धमकावत आहे, मग येथे तक्रार करा, जाणून घ्या काय सांगतो RBIचा नियम


तुमच्या नावावरही कोणी कर्ज घेतले आहे किंवा तुम्ही स्वतःसाठी कर्ज घेतले आहे का? आणि आता त्याच्या वसुलीसाठी बनावट एजंटने तुमचा छळ सुरु केला आहे किंवा तुम्हाला धमकावत आहे. त्यामुळे ही बातमी तुमच्या कामी येऊ शकते. होय, अनेकदा कर्ज घेतल्यानंतर बनावट वसुली एजंट कर्जाची परतफेड करण्यासाठी लोकांना त्रास देतात. त्यांना अनेक धमक्याही देतात. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

अनेकदा, बनावट रिकव्हरी एजंट ग्राहकांना कर्जाची परतफेड न केल्यामुळे धमकी देतात. परंतु आरबीआयच्या नियमानुसार, कर्जाची परतफेड करण्यासाठी कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही किंवा धमकावू शकत नाही. तुम्ही याबद्दल तक्रार कशी करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आरबीआयच्या नियमांनुसार, रिकव्हरी एजंट तुम्हाला फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेत कॉल करू शकतात. तसेच, ते तुम्हाला धमकावू शकत नाहीत किंवा कोणतेही अपमानास्पद संदेश पाठवू शकत नाहीत. ते तुम्हाला कोणत्याही प्रकारे शारीरिक किंवा मानसिक त्रास देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याबद्दल तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला त्यांनी पाठवलेले सर्व मेसेज आणि कॉल्सचे रेकॉर्डिंग ठेवावे लागेल. जेणेकरून त्यांनी तुमचा छळ केल्याचे तुम्ही सिद्ध करू शकता.

कर्ज वसुलीसाठी कोणी तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करू शकता. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यास त्या बँकेविरुद्ध दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करता येते. या सर्वांशिवाय तुम्ही त्या एजंटचे कॉलिंग नंबर, कॉल रेकॉर्डिंग, एसएमएस किंवा मेसेज सेव्ह करू शकता.