गेल्या 6 महिन्यांपासून नेपाळ क्रिकेटमध्ये खळबळ माजवणाऱ्या माजी कर्णधार संदीप लामिछानेच्या नावावर एक विशेष कामगिरी नोंदवण्यात आली आहे. नेपाळचा अनुभवी लेग-स्पिनर संदीप लामिछाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. 22 वर्षीय फिरकीपटूने ओमानविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली आणि आशियातील दिग्गज लेगस्पिनर राशिद खानचा विक्रम मोडला.
6 महिन्यांपूर्वी गेला होता तुरुंगात, आता परतला खेळायला, वेगवान 100 विकेट घेत राशिद खानला पछाडले
यंदाच्या आशिया चषकात स्थान मिळवण्यासाठी खेळल्या जाणाऱ्या एसीसी पुरुष प्रीमियर कपमध्ये नेपाळची ओमानशी टक्कर झाली. हा सामना नेपाळमधील कीर्तीपूर येथे खेळला जात होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाने 310 धावांची मजबूत धावसंख्या उभारली. यानंतर स्कोअरचा बचाव करताना लामिछानेने हा विक्रम केला.
सलामीवीर जतिंदर सिंग बाद झाल्यावर ओमानने पाचव्या षटकात पहिली विकेट गमावली. यानंतर 13व्या षटकात संदीप लामिछानेने तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अदिल शफिकविरुद्ध एलबीडब्ल्यूचे आवाहन केले. अंपायरने बोट उचलण्यापूर्वीच लामिछाने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. त्याने संघाला यश तर मिळवून दिलेच, पण एकदिवसीय क्रिकेटमधील 100वी विकेटही मिळवली.
लामिछानेने अवघ्या 42 व्या सामन्यात आपले शतक पूर्ण केले आणि अशा प्रकारे सर्वात जलद 100 बळी घेण्याचा विक्रम केला. त्याने अफगाणिस्तानचा दिग्गज राशिद खानला मागे टाकले ज्याने 44 सामन्यांमध्ये हा विक्रम केला.
संदीप लामिछाने याच्यासाठी गेले काही महिने चढ-उतारांचे होते. ऑक्टोबरमध्ये लामिछाने याला काठमांडूमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर नेपाळ क्रिकेटने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याबरोबरच निलंबित केले.
लामिछाने याची नंतर जामिनावर सुटका झाली आणि त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी नेपाळ क्रिकेटने निलंबनही रद्द केले. यानंतर त्याचे संघात पुनरागमन झाले, त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यानंतर मात्र तो संघाकडून सातत्याने खेळत आहे.