IPL 2023 दरम्यान एक वाईट बातमी आली आहे. ही बातमी भारतीय क्रिकेटपटूच्या अपघाताशी संबंधित आहे. विदर्भाचा माजी कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले, तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर प्रवीणच्या कारला अपघात झाला.
भारतीय क्रिकेटरसोबत मोठी दुर्घटना, कार अपघातात जखमी, पत्नीचा मृत्यू
56 वर्षीय रणजी प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर यांना रस्ता अपघातात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, वाईट बातमी म्हणजे या अपघातात त्यांची पत्नी सुवर्णा हिंगणीकर (52) हिला आपला जीव गमवावा लागला.
प्रवीण हिंगणीकर सध्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी मुख्य क्युरेटर म्हणून संबंधित आहेत. बुलढाणा पोलिसांनी सांगितले की, रणजी क्रिकेट प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर यांच्या गाडीला अपघात झाला. समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्याजवळ हा अपघात झाला असून, त्यात ते जखमी झाले आहेत. या अपघातात त्यांची पत्नी सुवर्णा हिंगणीकर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी प्रवीण हिंगणीकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रवीण हिंगणीकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर ते विदर्भासाठी 52 रणजी सामने खेळले आहेत. प्रवीणने 1983 ते 1995 दरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यांमध्ये 2805 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतकेही झळकावली आहेत.