IPL 2023: आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीवर कारवाईचा बडगा, बीसीसीआयची मोठी कारवाई


सामना हरला आणि वरून शिक्षा देखील झाली. विराट कोहली आरसीबीचा कर्णधार नसला तरी संघाच्या पराभवानंतर बीसीसीआयने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. विराट कोहलीने आपली चूक मान्य केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

बीसीसीआयने विराट कोहलीला आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. याअंतर्गत त्याच्या मॅच फीमध्ये 10 टक्के कपात करण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध संघाचा 8 धावांनी पराभव झाल्यानंतर विराट कोहलीवर लावण्यात आलेला हा दंड आता शिक्षेपेक्षा थोडा कमी आहे.

आरसीबीचा फलंदाज आयपीएलच्या आचारसंहिता 2.2 अंतर्गत लेव्हल 1 च्या गुन्ह्यासाठी दोषी आढळला आहे. मात्र, त्याने कोणती चूक केली, हे स्पष्ट झालेले नाही. लेव्हल 1 मध्ये दोषी आढळल्यास, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि वैध असतो. आणि, विराट कोहलीने रेफ्रीसमोर आपली चूक मान्य केल्याची बातमी आहे. म्हणजे आता या प्रकरणी आणखी कोणतीही कारवाई होणार नाही.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीचा विचार केला, तर तो फिका पडला आहे. 227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात त्याची फलंदाजी संपुष्टात आली. 4 चेंडूत अवघ्या 6 धावा केल्यानंतर सीएसकेचा प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेला गोलंदाज आकाश सिंगचा विराट कोहली बळी ठरला.

आकाश सिंगच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीची दांडी गुल झाली. मात्र, यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण तरीही आरसीबी लक्ष्यापासून 8 धावा दूरच राहिला.