जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर वापसीच्या तयारीत, बीसीसीआयने आयपीएल दरम्यान दिली मोठी अपडेट


जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे दोघेही दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानाबाहेर आहेत. बुमराह मागील अनेक महिन्यांपासून पाठीच्या समस्येने त्रस्त आहे. दुखापतीमुळे तो गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक खेळू शकला नाही, त्याचबरोबर तो आयपीएल 2023 चा भागही नाही. श्रेयस अय्यर देखील पाठीच्या दुखापतीशी झुंजत आहे आणि यामुळे तो आयपीएल 2023 मधूनही बाहेर पडला आहे.

बुमराह आणि अय्यरच्या दुखापतीमुळे सर्वांचेच टेन्शन वाढले, कारण भारताला यंदा वर्ल्डकपचे आयोजन करायचे आहे. अशा स्थितीत दोन बड्या खेळाडूंच्या दुखापतीने डोकेदुखी वाढवली. आता बीसीसीआयने दोघांच्या दुखापतीबाबत मोठा अपडेट दिला आहे. बीसीसीआयने शनिवारी ट्विट केले की, वेगवान गोलंदाज बुमराहच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.


बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्याला आता वेदना होत नाहीत. 6 आठवड्यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना पुनर्वसन सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, बुमराहने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या पुनर्वसनावरही काम सुरू केले आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या पाठीवर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. तो 2 आठवडे सर्जनच्या देखरेखीखाली असेल आणि त्यानंतर तो एनसीएमध्ये पुनर्वसनासाठी जाईल.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल सांगायचे झाले तर, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी मालिकेदरम्यान जखमी झाला होता. याच कारणामुळे तो बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील शेवटचा सामना खेळू शकला नाही आणि एकदिवसीय मालिकेतूनही तो बाहेर पडला. अय्यर याआधीही या दुखापतीमुळे त्रस्त होता.