ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर विराट कोहली, रोहित शर्मावर नजरा, खेळणार 90 हजार कोटींहून मोठ्या लीगमध्ये!


विराट कोहली, रोहित शर्मा सध्या आयपीएल 2023 मध्ये व्यस्त आहेत. कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी धडाकेबाज खेळ करत आहे, तर रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटूंबाबतचा एक अहवाल खूप चर्चेत आहे. द एज आणि द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या बातमीनुसार, सौदी अरेबिया आगामी काळात 90,000 कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह आयपीएलमध्ये एक मोठी आणि महागडी क्रिकेट लीग करण्याची योजना आखत आहे. ते आपल्या योजनेत आयपीएलच्या संघमालकांची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहे.

एवढेच नाही तर सौदी अरेबियाचे सरकारी अधिकारी आयपीएलच्या संघमालकांशी सर्वात मोठी टी-20 लीग आयोजित करण्याच्या नियोजनाबाबत वर्षभरापासून बोलत आहेत. रिपोर्ट्सनुसार, अनेक देशांचे प्रशिक्षक आणि खेळाडूंनाही वर्षभरापासून अनौपचारिक चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

भारतीय क्रिकेटपटूंवरही सौदी अरेबियाची नजर आहे. वृत्तानुसार, या लीगबाबत काही भारतीय खेळाडूंशी चर्चा झाली आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार भारतीय खेळाडू परदेशी टी-20 लीगमध्ये सहभागी होऊ शकत नसले, तरी सौदी अरेबियाच्या प्रस्तावानंतर या नियमातही बदल पाहायला मिळू शकतात. असे झाले तर विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्यासारखे दिग्गज खेळाडू सौदी अरेबियात खेळताना दिसू शकतात.

सौदी अरेबिया क्रीडा जगतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाच्या क्लबने अनुभवी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत करार केला होता. आता सौदी अरेबिया क्रिकेटमध्ये रस दाखवत आहे. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनीही सौदी अरेबिया क्रिकेटमध्ये रस दाखवत असल्याची पुष्टी केली आहे.