Who is Leena Tiwari : 30 हजार कोटींहून अधिक संपत्ती, देशातील पाच श्रीमंत महिलांच्या नावांचा समावेश


फोर्ब्सने 2023 सालासाठी अब्जाधीशांची वार्षिक यादी जाहीर केली आहे. लोकप्रिय बिझनेस मॅगझिनने भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची यादीही प्रसिद्ध केली आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने 2023 च्या भारतातील अब्जाधीशांच्या यादीत 16 नवीन अब्जाधीशांचाही समावेश केला आहे, ज्यापैकी तीन महिला आहेत.

फोर्ब्सच्या यादीनुसार, भारतातील पाच श्रीमंत महिलांमध्ये सावित्री जिंदाल, रोहिका सायरस मिस्त्री, रेखा झुनझुनवाला, विनोद राय गुप्ता आणि लीना तिवारी यांची नावे आहेत. लीना गांधी तिवारी यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कारण त्या मीडियासमोर येण्याचे टाळतात. पण त्या एका मोठ्या फार्मा कंपनीच्या मालक आहे.

लीना तिवारी या खाजगी कंपनी USV India च्या चेअरपर्सन आहेत. त्यांची सध्याची एकूण संपत्ती 3.7 अब्ज डॉलर म्हणजेच 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सध्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत लीना तिवारी बायोकॉनच्या किरण मुझुमदार शॉ, न्याकाच्या फाल्गुनी नायर आणि झोहो कॉर्पच्या राधा वेंबू यांच्या पुढे आहे.

त्यांची फार्मा कंपनी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि मधुमेहावरील औषधांच्या विभागातील भारतातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये आहे. कंपनी अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (एपीआय), इंजेक्टेबल्स आणि बायोसिमिलर औषधे देखील बनवते. USV चे ग्लायकोमेंट नावाचे मधुमेहविरोधी औषध घरगुती उद्योगातील टॉप-3 औषधांमध्ये समाविष्ट आहे.

तिवारी मुंबईतील बहुतांश सामाजिक कार्यक्रम आणि पार्ट्यांपासून दूर राहतात. पण त्या लोकांच्या हितासाठी काम करत असतात. तिवारी या 65 वर्षीय व्यावसायिक महिला यांना प्रवास करणे आणि पुस्तके वाचणे आवडते. लीना तिवारी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम आणि बोस्टन विद्यापीठातून एमबीए केले आहे.

लीना तिवारी यांचे पती प्रशांत तिवारी आहेत, ते USV चे MD आहेत आणि कंपनी चालवतात. प्रशांत तिवारी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षणही घेतले आहे. दोघांनाही एक मुलगी असून तिचे नाव अनिशा गांधी तिवारी आहे.