CNG-PNG Price : मुंबई ते फरिदाबादला महागाईतून दिलासा, जाणून घ्या कुठे कमी झाले CNG-PNG चे दर


वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीतील बदलामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम काही शहरांमध्येही दिसून येत आहे. मुंबई, अहमदाबाद, वडोदरा यांसारख्या शहरांमध्येही त्याचे दर खाली आले आहेत. सीएनजी-पीएनजीचे दर कुठे कमी झाले ते जाणून घ्या

किरीट पारेख समितीच्या शिफारशी केंद्र सरकारने गुरुवारी स्वीकारल्या. नव्या सूत्रानुसार आता देशांतर्गत बाजारपेठेतील नैसर्गिक वायूच्या किमती भारतीय क्रूड बास्केटवर आधारित असतील. त्यासाठी मागील एक महिन्याच्या भावाचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे पीएनजीच्या किमती 10 टक्के आणि सीएनजीच्या किमतीत 9 टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) कंपनीने सीएनजीच्या दरात प्रति किलो आठ रुपयांची कपात केली आहे. तर पीएनजीच्या दरात प्रति युनिट 5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

आता मुंबईत सीएनजी 79 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 49 रुपये प्रति युनिट दराने मिळणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12 पासून नवीन दर लागू झाले आहेत. एमजीएल ही सार्वजनिक क्षेत्रातील गेल इंडियाची उपकंपनी आहे.

एमजीएलने याआधी फेब्रुवारीमध्येही सीएनजीच्या किमतीत 2.5 रुपये प्रति किलोने कपात केली होती. तथापि, असे असूनही, सीएनजीचे दर वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी जास्त आहेत.

देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी-पीएनजीचा पुरवठा करणाऱ्या अदानी समूहाच्या अदानी टोटल गॅस या कंपनीनेही सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सीएनजीचे दर प्रति किलो 8.13 रुपये आणि पीएनजीच्या किमती 5.06 रुपये प्रति युनिटने कमी केल्या आहेत. अदानी टोटल गॅस कंपनी सध्या प्रामुख्याने अहमदाबाद, वडोदरा, फरीदाबाद आणि खुर्दा येथे कार्यरत आहे. त्यामुळे या सर्व शहरांमध्ये सीएनजी-पीएनजीच्या किमती कमी होणार आहेत.