आता वाहनांमध्ये सीएनजी-पीएनजी भरणे स्वस्त होणार, पेट्रोल-डिझेलचे दरही होणार कमी !


तुम्ही तुमच्या कारमध्ये CNG किंवा PNG गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करण्यासाठी सरकारने गुरुवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत सीएनजी किंवा पीएनजीच्या किमती 6 ते 10 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांना वाहनात सीएनजी किंवा पीएनजी गॅस भरणे स्वस्त होणार आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. कारण तेल विपणन कंपन्यांना नफा मिळू लागला आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरही दर महिन्याला निश्चित होणार आहेत.

एका अहवालानुसार पेट्रोलियम कंपन्यांना डिझेलवर नफा मिळू लागला आहे. पेट्रोलवर आधीच नफा मिळत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कंपन्या लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करू शकतात. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे तेल विपणन कंपन्यांना दोन्ही प्रकारच्या इंधनावर नफा मिळू लागला आहे. दुसरे कारण म्हणजे येत्या महिन्यात कर्नाटकात निवडणुका आहेत, त्यानंतर पेट्रोलचे दर स्वस्त होऊ शकतात.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आता आंतरराष्ट्रीय हब गॅसच्या किमतीऐवजी गॅसच्या किमतीला आयात कच्च्या तेलाशी जोडण्यात आले आहे. आणि घरगुती गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या 10 टक्के असेल, जी दर महिन्याला निश्चित केली जाईल. म्हणजेच आता घरगुती नैसर्गिक वायूचे दर महिन्याला निश्चित केले जातील.