अक्षर पटेल हा भारतीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. आता जागतिक क्रिकेटलाही त्याची ओळख पटली आहे. पण, डेव्हिड वॉर्नरला अजूनही ही गोष्ट समजलेली नाही, असे दिसते. त्यामुळेच भारतीय मैदानावर आयपीएल खेळताना अक्षर पटेलला गोलंदाजी न देण्याची चूक त्याने केली आणि परिणामी दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
अक्षर पटेलला का दिले नाही एकही षटक? डेव्हिड वॉर्नरचे उत्तर ऐकून लावाल डोक्याला हात
अक्षर पटेलसारखा खेळाडू ज्या कर्णधाराच्या संघात असेल त्याला त्याचा पुरेपूर वापर करायला आवडेल. पण, डेव्हिड वॉर्नरने या अष्टपैलू खेळाडूचा गुजरात टायटन्सविरुद्ध अर्धाच वापर केला. अक्षर पटेलने गुजरातविरुद्ध फलंदाजी केली, धावाही केल्या, पण दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने त्याला गोलंदाजीसाठी चेंडू दिला नाही.
डेव्हिड वॉर्नरने असे का केले हा प्रश्न आहे. तर याचे उत्तरही त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया. सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नरला याबाबत विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, विकेट आणि सामन्याची परिस्थिती लक्षात घेऊन अक्षर पटेलला ओव्हर न देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यापेक्षा कुलदीप आणि मिचेल मार्श जास्त प्रभावी ठरतील, असे त्याला वाटले.
आता ज्याचा त्याचा विचार. डेव्हिड वॉर्नरने त्याला जे वाटले, ते केले पण त्याचा संघाला फायदा झाला नाही. फलंदाजीत, अक्षर पटेलने गुजरात टायटन्सविरुद्ध 22 चेंडूत 36 धावा फटकावल्या, ज्यात 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. पण, डेव्हिड वॉर्नरने त्याला गोलंदाजीत संधी न देऊन चूक केली, जे दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचे एक कारण ठरले.