राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षकाला पहिल्याच चेंडूवर केले आऊट, आता 7 विकेट्स घेऊन निर्माण केली दहशत


सध्या आयपीएल 2023 सुरू आहे. पण, त्याची एंट्री इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2020 च्या आवृत्तीत प्रथमच झाली. जेव्हा तो आयपीएलशी जोडला गेला, तेव्हा इतिहास घडला. कारण, भारतीय लीगमध्ये सहभागी होणारा तो पहिला अमेरिकन क्रिकेटर होता. आम्ही अली खानबद्दल बोलत आहोत, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख रुपयांमध्ये संघात घेतले होते. मोसमात एक सामना खेळण्याआधीच तो दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला, ही वेगळी बाब. पण, आता पुन्हा एकदा तो 7 विकेट्स घेऊन चर्चेत आला आहे.

अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खानने क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीच्या प्लेऑफ सामन्यात 7 विकेट घेतल्या. त्याने न्यू जर्सीविरुद्ध धारदार गोलंदाजी केली आणि आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे अमेरिकेने केवळ न्यू जर्सीचा पराभव केला नाही, तर आपल्या संघाला झिम्बाब्वे येथे होणाऱ्या स्पर्धेत स्थान मिळवून दिले, तेथून या वर्षी एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी तिकीट मिळू शकते.

अमेरिकेच्या 232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जर्सी संघ उतरला, तेव्हा अली खानच्या चेंडूंना त्यांच्याकडे उत्तर नव्हते. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी लावलेल्या जाळ्यात ते अडकले. अली खानने 9.4 षटकांच्या गोलंदाजीत 32 धावा देऊन 7 विकेट घेतल्या, ही त्याची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना अॅमेझॉन वॉरियर्सकडून खेळताना कुमार संगकाराला पहिल्याच चेंडूवर बाद केल्यावर अली खान प्रसिद्धीच्या झोतात आला. कुमार संगकारा आता आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा संचालक आणि मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. अली खान अजूनही कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो. फरक एवढाच की त्याचा संघ आता त्रिनबागो नाइट रायडर्स आहे.