प्रभासच्या आदिपुरुषच्या नवीन पोस्टरवरून वाद, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरोधात तक्रार दाखल


सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा आदिपुरुष हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी चित्रपटाच्या पोस्टरवरून गदारोळ झाला असून आदिपुरुषच्या निर्मात्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत चित्रपटाचा निर्माता, कलाकार आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत ही तक्रार केली आहे. तक्रारदाराने स्वतःला सनातन धर्माचा प्रचारक असल्याचे सांगितले आहे. नवीन पोस्टरमध्ये सर्व कलाकारांना जनेऊ न घालता दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

पोस्टरमध्ये सीता मातेच्या भांगेमध्ये सिंदूर नसल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या गोष्टींबाबत हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तक्रारदाराने आयपीसीच्या कलम 295 (ए), 298, 500, 34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आदिपुरुष हा चित्रपट रामचरितमानसच्या आधारे तयार करण्यात आलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचे चरित्र आहे. हिंदू धर्म आणि सनातन धर्मात या पवित्र ग्रंथाचे खूप महत्त्व आहे आणि अनेक युगांपासून त्याचे पालन केले जात आहे.

असा आरोप आहे की पोस्टरमध्ये भगवान राम अशा कपड्यांमध्ये दाखवले गेले आहेत, जे हिंदू ग्रंथ रामचरितमानसच्या नैसर्गिक भावनेच्या विरुद्ध आहे. पोस्टरमधील सर्व पात्र जनेऊशिवाय दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक दशकांपासून पुराणांच्या आधारे लोक पाळत असलेल्या हिंदू सनातन धर्मात जनेयूला विशेष महत्त्व आहे, असे म्हटले जाते.