IPL 2023 : 49 चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज बाहेर, आरसीबीला मोठा झटका


IPL-2023 च्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. गेल्या मोसमात संघासाठी सर्वोत्तम फलंदाजी करणारा फलंदाज या मोसमातून बाहेर आहे. हा खेळाडू आहे रजत पाटीदार. पाटीदार दुखापतग्रस्त आहे आणि त्यामुळेच तो पहिल्या सामन्यात खेळला नाही. बंगळुरूला आशा होती की तो पुनरागमन करेल पण आयपीएलमध्ये पुनरागमन करणे त्याच्यासाठी कठीण आहे. बंगळुरूने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

बंगळुरूने सांगितले की रजतच्या टाचेला दुखापत झाली आहे आणि त्यामुळेच तो आयपीएलच्या चालू हंगामात खेळू शकणार नाही. रजत लवकर बरा व्हावा यासाठी फ्रेंचायझीने प्रार्थना केली आहे.


पाटीदार सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. तिथे पाटीदार आपल्या दुखापतीवर काम करत आहेत. आयपीएल सुरू होण्यापूर्वी तो येथे पोहोचला होता. यामुळे तो आयपीएलच्या पूर्वार्धात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु आता संपूर्ण हंगामात तो खेळू शकणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या मोसमात या फलंदाजाने दमदार कामगिरी करत संघाला प्लेऑफमध्ये नेण्यात मोठी भूमिका बजावली होती.

पाटीदारने गेल्या मोसमात सात डावांत 152.75 च्या स्ट्राइक रेटने 333 धावा केल्या होत्या. गेल्या मोसमात तो आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. गेल्या मोसमात त्याचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आणि त्यात त्याने चांगलीच चमक दाखवली. त्याने प्लेऑफमध्ये शतक झळकावले. यासह तो प्लेऑफमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनला.

पाटीदारच्या बाहेर पडल्याने बंगळुरूच्या जखमी खेळाडूंची यादी वाढली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आधीच दुखापतग्रस्त आहे. रीस टोपलीलाही पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. विल जॅकही दुखापतीमुळे IPL-2023 मध्ये येऊ शकला नाही.