आयपीएल 2023 च्या 7 व्या सामन्यात, गेल्या वेळचा चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असतील. लीगच्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करणारा हार्दिक पांड्याचा संघ गुजरातची मान उंचावत असून विजयाची घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सचा पहिला विजय नोंदवण्याकडे लक्ष आहे. गेल्या सामन्यात दिल्लीला लखनौ सुपर जायंट्सकडून 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यंदाच्या मोसमात दिल्लीची कमान डेव्हिड वॉर्नरच्या हाती आहे.
DC vs GT : वॉर्नर पांड्यासोबत ‘युद्ध’ करण्यास, घरच्या मैदानावर पूर्ण होणार का दिल्लीची विजयाची आस?
पहिल्या विजयानंतर गुजरातलाही मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू केन विल्यमसन मायदेशी रवाना झाला आहे. खरे तर पहिल्याच सामन्यात विल्यमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, हा मोठा धक्का बसला तरी गुजरातचा संघ बलाढय़ आहे.
गेल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी दिल्लीची निराशा केली होती. एनरिक नॉर्खियाच्या अनुपस्थितीत दिल्लीचे गोलंदाज लखनौच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत. गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणही दिल्लीसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या सामन्यात दिल्लीच्या पराभवामागे खराब क्षेत्ररक्षण हे प्रमुख कारण ठरले. खलीलने काइल मेयर्सचा झेल सोडला, त्यानंतर मेयर्सने 73 धावा केल्या आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा फटका दिल्लीला सहन करावा लागला. गुजरातविरुद्ध साकारियाच्या जागी दिल्ली मुस्तफिझूर रहमानला संधी देऊ शकते, ज्याने गेल्या वेळी या संघाविरुद्ध 3 बळी घेतले होते.
गेल्या मोसमात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा गुजरातने 14 धावांनी विजय मिळवला होता. शुभमन गिलने शानदार 84 धावा केल्या होत्या. तो अजूनही त्याच फॉर्ममध्ये आहे. चेन्नईविरुद्ध त्याने 63 धावांची खेळी खेळली होती. अपघातामुळे यंदाच्या मोसमातून बाहेर झालेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच गुजरातच्या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करू शकला नव्हता. आता गुजरातला विजयाची घोडदौड कायम राखता येते की दिल्लीला विजयाचे खाते उघडता येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.