हैदराबादच्या फलंदाजांचे उडत होते धिंदवडे, 7200 किमी दूर धुमाकूळ घालत होता कर्णधार, ठोकले झंझावाती शतक


राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 72 धावांनी पराभव करून आयपीएल 2023 मधील त्यांच्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. राजस्थानने 204 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर राजस्थानने हैदराबादच्या फलंदाजांना 131 धावांत रोखले. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक 32 धावा केल्या. 5 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. हैदराबादची फलंदाजी बुडाली असताना, त्याचवेळी संघाच्या कर्णधाराने 7200 किमी अंतरावर तुफानी शतक ठोकले.

खरेतर, पहिल्या सामन्यात, भुवनेश्वर कुमारने एडन मार्करामच्या जागी हैदराबादची जबाबदारी स्वीकारली, कारण मार्कराम अजूनही नेदरलँड्सविरुद्धच्या 3 वनडे मालिकेत व्यस्त होता. याच कारणामुळे तो उशिरा हैदराबादसोबत रुजू होणार आहे. एकीकडे हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांसमोर झुंजत होते. दुसरीकडे, नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मार्कराम दक्षिण आफ्रिकेला विजयाकडे नेत होता.

मार्करामने नेदरलँड्सविरुद्ध 175 धावांची खेळी करत कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले. हा त्याचा 50 वा एकदिवसीय सामना होता आणि त्याने आपला सामना संस्मरणीय बनवला. मार्करामने आपल्या खेळीत 17 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याच्याशिवाय डेव्हिड मिलरने 91 धावांची खेळी केली. मार्कराम आणि मिलरच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 370 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 224 धावांवर गारद झाला. सिसांडा मगालाने 43 धावांत 5 बळी घेतले. त्याचवेळी मार्करामला 40 धावांत 2 यश मिळाले. मार्कराम प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीज होता. गॅरी कर्स्टन, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, जानेमन मलान, एबी डिव्हिलियर्स आणि हर्शेल गिब्स यांच्यानंतर सर्वात मोठी एकदिवसीय खेळी खेळणारा मार्कराम हा दक्षिण आफ्रिकेचा 7वा फलंदाज ठरला आहे.