आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला या मोसमात विजयासह स्पर्धेची सुरुवात करता आली नाही. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईने सामना गमावला, पण नेहल वढेरा षटकार ठोकून रातोरात स्टार झाला. खरे तर हा षटकार नव्हता, तर तो एक प्रकारची गोलंदाजाची धुलाई होती. मुंबईने 48 धावांवर 4 विकेट गमावल्या असताना नेहल क्रिझवर आला होता. यानंतर तिलक वर्मा आणि नवोदित नेहल यांनी मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला.
101 मीटरचा षटकार, 578 धावांची चकित करणारी खेळी, जाणून घ्या कोण आहे रोहितचा नवा ‘हिटमॅन’
तिलक 84 धावांवर नाबाद राहिला आणि नेहलने 13 चेंडूत 21 धावा ठोकल्या. तिलक आणि नेहलच्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबईने 7 बाद 171 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 172 धावांचे लक्ष्य 16.2 षटकांतच पूर्ण केले. नेहलची खेळी लहान असेल, पण त्याने 13 चेंडूत खळबळ उडवून दिली.
नेहलने आपल्या धडाकेबाज खेळीत एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. यादरम्यान त्याने कर्ण शर्माच्या चेंडूवर असा षटकार ठोकला, ज्यावर सर्वांचे डोळे उघडे राहिले. जवळपास 14 वे षटक होते. कर्णच्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने 101 मीटर लांब लाँग ऑनच्या दिशेने षटकार मारला. नेहलने चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर नेला. या आयपीएल 2023 मध्ये 100 मीटर लांब षटकार मारणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
22 वर्षीय नेहलला मुंबईने 20 लाख रुपयांना लिलावात विकत घेतले. हे देखील मनोरंजक आहे की जेव्हा मुंबईने नेहलला विकत घेतले, तेव्हा तोपर्यंत त्याने एकही व्यावसायिक टी-20 सामना खेळला नव्हता. एवढेच नाही तर वरिष्ठ स्तरावर एकही सामना खेळला नाही. मुंबईने विकत घेतल्यानंतरच त्याने यावर्षी जानेवारीत रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. त्याचवेळी, आरसीबी विरुद्धचा सामना हा त्याचा पहिला आयपीएल सामनाच नाही तर त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी-20 सामनाही होता.
नेहलची षटकार मारण्याची ताकद आता संपूर्ण देशाने पाहिली आहे, परंतु त्याला मोठी खेळी कशी खेळायची हे देखील माहित आहे, हे क्वचितच लोकांना माहित असेल. वर्षभरापूर्वी पंजाबमध्ये 23 वर्षांखालील आंतरजिल्हा स्पर्धेत त्याने भटिंडाविरुद्ध एकाच डावात 578 धावा ठोकल्या होत्या. लुधियानाकडून खेळताना नेहलने 42 चौकार आणि 37 षटकार मारले होते.