संघाबाहेर जाण्याची मनात भीती, पण मैदानावर पडत होता धावांचा पाऊस, जागा वाचवण्यासाठी सेहवागने रचला इतिहास


भारताने क्रिकेट जगताला एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज दिले आहेत. पण वर्षानुवर्षे एक काम कोणीच करू शकले नाही. हे काम भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने 2004 मध्ये केले होते. हे काम कसोटीत त्रिशतक ठोकण्याचे होते. कसोटीत त्रिशतक झळकावणारा सेहवाग हा पहिला भारतीय फलंदाज आहे. सेहवागने हे काम एकदा नाही तर दोनदा केले आहे, तर पहिल्यांदाच या तुफानी फलंदाजाने हे काम आजच्या दिवशी म्हणजेच 29 मार्च 2004 मध्ये केले होते. सेहवागने मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध हे त्रिशतक ठोकले.

मात्र या त्रिशतकापूर्वी सेहवागला संघ व्यवस्थापन त्याला संघातून वगळण्याची भीती होती. सेहवागने त्यादिवशी कोणतीही भीती न बाळगता आपल्या शैलीत फलंदाजी करत मुलतानमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचा जोरदार समाचार घेत इतिहास रचला. 28 मार्चपासून सामना सुरू झाला आणि सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेहवागने 300 चा आकडा गाठला.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या दिवसअखेर दोन गडी गमावून 356 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत सेहवाग 228 आणि सचिन 60 धावा करून नाबाद परतला. भारताने सलामीवीर आकाश चोप्रा (42) आणि कर्णधार राहुल द्रविड (6) यांची विकेट गमावली होती. यानंतर सेहवाग आणि सचिनने संघाची धुरा सांभाळत संघाला मजबूत स्थितीत आणले.

दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर सेहवागने पाकिस्तानचा अनुभवी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताकला षटकार खेचून आपल्या 300 धावा पूर्ण केल्या आणि इतिहास रचला. यानंतर त्याच्या खात्यात आणखी नऊ धावांची भर पडल्यानंतर तो बाद झाला. सेहवागने या सामन्यात 375 चेंडूंचा सामना केला आणि 39 चौकार आणि सहा षटकार मारले. यासह भारतासाठी कसोटीतील एका डावात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम सेहवागच्या नावावर नोंदवला गेला, जो यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर होता. लक्ष्मणने कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 281 धावा केल्या होत्या.

हा तोच सामना आहे ज्यात राहुल द्रविडने सचिनला त्याचे द्विशतक पूर्ण करू दिले नाही आणि तो 194 धावांवर असताना राहुलने भारताचा पहिला डाव घोषित केला. सचिन 348 चेंडूंत 21 चौकारांच्या मदतीने 194 धावा करून नाबाद परतला. भारताने पहिला डाव 5 विकेट गमावून 675 धावांवर घोषित केला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात युवराज सिंगने नाबाद 59 धावा केल्या. पाकिस्तानने या धावसंख्येचा चांगलाच सामना करत पहिल्या डावात 407 धावा केल्या होत्या. मात्र त्याला फॉलोऑन खेळावा लागला. यजमान संघाला दुसऱ्या डावात केवळ 216 धावाच करता आल्या. यासह भारताने हा सामना एक डाव आणि 52 धावांनी जिंकला.

सेहवागची ही खेळी त्याच्या आवडत्या खेळींपैकी एक आहे. आशिया कप-2022 च्या आधी स्टार स्पोर्ट्सवर सेहवाग म्हणाला होता की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यातील मुलतानमध्ये खेळलेली 309 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम आठवण आहे. त्याने सांगितले होते की या सामन्यापूर्वी त्याने चार डावात जास्त धावा केल्या नाहीत आणि त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला वगळेल अशी भीती वाटत होती. सेहवागने मुलतानमध्ये खेळलेल्या इनिंगनंतर त्याचे संघात स्थान निश्चित झाले आणि तो बराच काळ संघाचा सलामीवीर राहिला.सेहवागची गणना भारताच्या सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये केली जाते.