पाकिस्तानी फलंदाजाला 3 चेंडू खेळणे झाले अवघड, 3 वर्षात खेळले 4 सामने, केली शुन्याची हॅट्ट्रिक


खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या सूर्यकुमार यादवसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका दु:खद स्वप्नसारखी होती. मालिकेतील तिन्ही सामन्यांत तो खाते न उघडता माघारी परतला. सूर्यकुमारचा मार्ग अनुसरत पाकिस्तानच्या फलंदाजानेही नकोसा पराक्रम केला. पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफीकनेही डक होण्याची हॅट्ट्रिक केली आहे, पण त्याने ही हॅट्ट्रिक वनडेत नाही, तर टी-20 मध्ये केली आहे.

शफिकचे प्रदीर्घ कालावधीनंतर टी-20मध्ये पुनरागमन झाले. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात तो मैदानात आला आणि अवघे दोन चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. शफीकला खातेही उघडता आले नाही आणि अजमतुल्लाहच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला.

शफिकने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत केवळ चार सामने खेळले आहेत. त्याने 10 नोव्हेंबर 2020 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले आणि 41 धावा केल्या. यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळले, ज्यात तो खाते न उघडता परतला. असाच प्रकार शुक्रवारी शारजाहमध्ये घडला.

योगायोगाची बाब म्हणजे या तिन्ही सामन्यांमध्ये शफिक केवळ दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. हा फलंदाज आपल्या डावातील तिसरा चेंडू खेळण्यासाठी आसुसलेला आहे. कारकिर्दीतील एकमेव एकदिवसीय सामन्यातही त्याने केवळ दोन धावा केल्या आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात केवळ शफीकच नाही तर पाकिस्तानची संपूर्ण फलंदाजी फ्लॉप झाली. त्यामुळेच संघाला 92 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानने हे लक्ष्य चार विकेट्स गमावून पूर्ण केले आणि पहिल्यांदाच टी-20 सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला.