22 वर्षीय गोलंदाजाची हॅटट्रिक, संघाला मिळवून दिला 1 धावेने विजय


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक प्रत्येक गोलंदाजाचे जे स्वप्न असते तेच झिम्बाब्वेचा फिरकीपटू वेस्ली मधवेरे याने केले आहे. झिम्बाब्वेच्या 22 वर्षीय फिरकी अष्टपैलू खेळाडूने नेदरलँड्सविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक घेत इतिहास रचला. हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या 44व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंमध्ये नेदरलँडच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत मधेवरेने क्रिकेटच्या विक्रमांच्या यादीत आपले नाव नोंदवले.

नेदरलँडविरुद्ध पहिला वनडे हरलेल्या झिम्बाब्वेला मायदेशात मालिका गमावण्याचा धोका होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 271 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 43 व्या षटकापर्यंत सुस्थितीत होता. संघाने 3 गडी गमावून 213 धावा केल्या होत्या आणि शेवटच्या 7 चेंडूत 59 धावांची गरज होती. झिम्बाब्वेला चमत्काराची गरज होती.

22 वर्षीय ऑफस्पिनर मधेवरेने यजमान संघासाठी हा करिष्मा केला. मधेवरेने या सामन्यात तोपर्यंत चांगली गोलंदाजी केली आणि 7 षटकात केवळ 25 धावा दिल्या मात्र त्याला विकेट मिळाली नाही. या दमदार गोलंदाजीचे बक्षीस त्याला छप्पर फाडून मिळाले.

44व्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या मधेवरेने धडाकेबाज फलंदाज कॉलिन अकरमनला पहिल्याच चेंडूवर यष्टिचित केले. यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर त्याने तेजा निदामनुरु आणि पॉल व्हॅन मीकेरेन यांना आऊट करत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

अशाप्रकारे हॅट्ट्रिक घेणारा तो तिसरा झिम्बाब्वेचा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी, झिम्बाब्वेसाठी 1997 मध्ये, एडो ब्रँडेसने इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा हॅटट्रिक घेतली होती. त्यानंतर 2014 मध्ये प्रॉस्पर उत्सेयाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला होता.

मधेवरेच्या या हॅट्ट्रिकने सामन्याचे चित्रच पालटले आणि झिम्बाब्वेला सामन्यात परतवून आणले. झिम्बाब्वेने पुढील 5 षटकांत आणखी 3 गडी बाद केले आणि नेदरलँड्सने 49 षटकांत 9 बाद 253 धावा केल्या. त्यानंतर शेवटचे षटक आले, जे सर्वांच्या अपेक्षेपलीकडचे होते. या 6 चेंडूत झिम्बाब्वेला फक्त 1 विकेटची गरज होती, तर नेदरलँड्सला 19 धावांची गरज होती. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तेंडाई चताराला चौकार मिळाला. त्यानंतर पुढच्या 3 चेंडूत 5 धावा आल्या.

फ्रेड क्लासेनने ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. आता शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. क्लॉसेन आणि रायन क्लाइनने दोन धावा केल्या आणि तिसरी धाव घेऊन सामना टाय करण्याचा प्रयत्न केला, परंतु क्लाइन धावबाद झाला आणि झिम्बाब्वेने 1 धावांनी सामना जिंकला.