रमजान महिन्यापूर्वी उमरा करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मक्का येथे पोहोचले आहेत. भारताची टेनिस क्वीन सानिया मिर्झा देखील तिच्या संपूर्ण कुटुंबासह उमरा करण्यासाठी मदिना येथे पोहोचली आहे. सानियाने नुकतेच आपल्या टेनिस करिअरला अलविदा म्हटले आहे.
तिचा मुलगा इझानही तिच्यासोबत गेला आहे. सानियाचे आई-वडील, तिची बहीण आणि भावजयही तिच्यासोबत उमरासाठी गेले आहेत. सोशल मीडियावर सानियाने तिच्या प्रवासाशी संबंधित काही छायाचित्रे शेअर केली, ज्यात इतर सर्वजण दिसत आहेत, पण शोएब मलिक दिसत नव्हता.
सानिया मिर्झा बुरखा आणि हिजाबमध्ये दिसली. तिचा मुलगा इझानही तिच्यासोबत कुर्ता पायजामामध्ये दिसला. सानिया तिच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे, पण सानिया शोएब मलिकशिवाय उमराला गेली हे चाहत्यांना आवडले नाही. काही चाहत्यांनी कमेंट करताना लिहिले की, मेहरमशिवाय उमरा कसला?
सानियाच्या छायाचित्रांना शोएब मलिकच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शोएब मलिक आणि सानिया मिर्झा वेगळे झाल्याची चर्चा सुरू आहे. आतापर्यंत दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये सानिया मिर्झासाठी भव्य फेअरवेल पार्टी आयोजित करण्यात आली होती. फेअरवेल मॅचनंतर सानियाने तिच्या फॅमिली आणि जवळच्या मित्रांसाठी पार्टीही आयोजित केली होती. येथे सानियाचे संपूर्ण कुटुंब दिसले पण शोएब मलिक दिसत नव्हता.