दोन सामन्यात शुन्यावर बाद, कारकिर्दीवर संकट, सूर्यकुमारविरुद्ध काय होती मिचेल स्टार्कची योजना?


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळलेला दुसरा एकदिवसीय सामना एकतर्फी ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. त्याच्या विजयाचा तारा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क होता, ज्याने 5 बळी घेतले.

स्टार्कने याआधी मुंबई वनडेतही 3 विकेट घेतल्या होत्या. या दोन्ही सामन्यांमध्ये एक खास गोष्ट होती. दोन्ही सामन्यांमध्ये त्याने टी-20मध्ये जगातील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवला आपला बळी बनवले. दोन्ही सामन्यात स्टार्कने पहिल्याच चेंडूवर सूर्याला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि त्यामुळे त्याला खातेही उघडता आले नाही.

सामन्यानंतर, जेव्हा स्टार्कला सूर्याबाबत कोणत्याही विशिष्ट योजनेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने स्पष्ट केले की त्याने कोणत्याही एका फलंदाजाबाबत कोणतीही योजना आखली नाही. समोरच्या फलंदाजाची पर्वा न करता फक्त विकेट घेणे हेच त्याचे ध्येय होते.

स्टार्कने गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या आपल्या एकमेव योजनेची पुनरावृत्ती करण्याबद्दल सांगितले, ज्यामध्ये त्याने स्टंपच्या रेषेवर एक लांब चेंडू टाकून स्विंग मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. स्टार्कने सांगितले की, संघातील त्याची भूमिका अशी आहे की तो पूर्ण लांबीचे चेंडू टाकून विकेट घेऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी वेगवान गोलंदाजाने विशाखापट्टणम वनडेत 53 धावांत 5 बळी घेतले. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने 5 बळी घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी त्याने 2015 विश्वचषक उपांत्य फेरीत 6 विकेट घेतल्या होत्या. एकूणच, त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत, त्याने 9व्यांदा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत.