आता आयसीसीमध्ये भारत-पाकिस्तानची ‘लढाई’, मोठ्या बैठकीत BCCI-PCB आमने-सामने


या वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये क्रिकेटच्या या सर्वात प्रसिद्ध स्पर्धेसाठी अनेक संघ भारतात जमतील. या स्पर्धेपूर्वी आणखी एक स्पर्धा होणार आहे – आशिया कप, ज्यामध्ये भारतासह आशियातील प्रमुख संघ सहभागी होतील. या दोन स्पर्धांभोवतीच गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण चर्चा सुरू आहे. कारण- भारत आणि पाकिस्तान. आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र बीसीसीआयने तेथे जाण्यास नकार दिला असून प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही वर्ल्डकपसाठी भारतात न येण्याची धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (ICC) उपस्थित होणार आहे.

शनिवार आणि रविवारी म्हणजेच 18 आणि 19 मार्च रोजी आयसीसीची कार्यकारी समिती आणि बोर्डाची बैठक आहे, ज्यामध्ये क्रिकेट बोर्डाचे सर्व अधिकारी सहभागी होतील. या बैठकीत अफगाणिस्तानमधील क्रिकेटची स्थिती, त्यांचे सदस्यत्व, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाची परिस्थिती यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या या बैठकीत आशिया चषक आणि विश्वचषकाबाबत दोन्ही देशांच्या भूमिकेचा मुद्दा समोर येणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख नजम सेठी हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. या अहवालानुसार दोन्ही देशांकडून त्यांचे संघ पाठवण्याच्या मुद्द्यावर या आयसीसी बैठकीत चर्चा होणार आहे. पाकिस्तानचा हा मुद्दा उपस्थित करण्यामागे केवळ आशिया चषकच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीही आहे.

खरं तर, पीसीबीला भीती आहे की जर भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानला गेला नाही, तर 2025 मध्ये आपल्या घरी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळीही तो असे करू शकतो, त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन रद्द होण्याची शक्यता आहे. स्पर्धा पाकिस्तान बाहेर करू शकतात.

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकाबाबत बीसीसीआयने गेल्या वर्षीच आपली भूमिका स्पष्ट केली होती की, ते या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नाहीत कारण त्यांना भारत सरकारची परवानगी मिळणार नाही. अशा स्थितीत ही स्पर्धा अन्य ठिकाणी होणार असून, त्याबाबतचा निर्णय या महिन्यात घेतला जाणार आहे. मात्र, बीसीसीआयच्या घोषणेनंतर पीसीबीनेही भारतात होणाऱ्या विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वी नजम सेठी यांनीही सांगितले होते की, भारतात जाण्याचा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल. अशा परिस्थितीत क्रिकेट जगताच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत.