Asia Cup : पाकिस्तानवर संतापला भज्जी, म्हणाला – ते लोक आपल्याच देशात सुरक्षित नाहीत, मग भारताने धोका का पत्करावा?


आशिया चषक 2023 च्या संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCI आमने-सामने आले आहेत. प्रकरण अद्याप सुटलेले नाही. खरे तर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. बीसीसीआयकडून हे ऐकून पाकिस्तान संतप्त झाला आहे आणि स्पर्धेचे यजमान हक्क राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानला अजूनही आशा आहे की ते या स्पर्धेचे आयोजन करू शकतील.

मात्र आशिया चषक कुठे होणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. एएनआयशी बोलताना भज्जी म्हणाला की, भारताने पाकिस्तानात जाऊ नये, कारण तेथील लोकही आपल्या देशात सुरक्षित नाहीत.

भारताचा अनुभवी हरभजन म्हणाला की, आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जात असेल तर ते सुरक्षित नसल्यामुळे भारताने तिथे जाण्याचा धोका पत्करू नये. पाकिस्तानच्या लोकांना स्वतःच्या देशात सुरक्षित वाटत नसताना, आम्ही तिथे जाण्याचा धोका का पत्करावा, असे भज्जी म्हणाला.

वास्तविक आशिया चषक 2023 चे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते, परंतु गेल्या वर्षी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले होते की भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. ते पाकिस्तानशी तटस्थ ठिकाणीच खेळेल. यानंतर पाकिस्ताननेही आपली वृत्ती दाखवली आणि सांगितले की, जर आशिया चषकाच्या यजमानपदाचे अधिकार पाकिस्तानकडून घेतले गेले, तर ते २०२३ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातही सहभागी होणार नाहीत, ज्याचे आयोजन भारताकडून केले जाणार आहे.