4 विश्वचषक फायनलसह 435 सामन्यांमध्ये केले अंपायरिंग, आता आयसीसी एलिट पॅनेलमधून बाहेर पडले अलीम दार


435 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह 4 विश्वचषक फायनलमध्ये अंपायरिंग केलेले पाकिस्तानचे अनुभवी पंच अलीम दार यांनी ICC एलिट पॅनेलमधून पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 54 वर्षीय दार, जे जवळपास 19 वर्षे एलिट पॅनेलवर होते, त्यांनी 2007, 2011 एकदिवसीय विश्वचषक फायनल आणि 2010 आणि 2012 टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भूमिका बजावली होती. आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळवणारे दार हे पाकिस्तानचे पहिले पंच होते.

दार यांनी 222 एकदिवसीय, 144 कसोटी आणि 69 टी-20 सामन्यांमध्ये अंपायरिंग केले. यादरम्यान त्यांनी 5 वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि 7 वेळा टी-20 विश्वचषकाची जबाबदारीही पार पाडली. 2009 ते 2011 अशी सलग तीन वर्षे डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी जिंकण्यातही ते यशस्वी ठरले.

आयसीसीशी बोलताना दार म्हणाले की, हा खूप लांबचा प्रवास आहे, पण मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे. जगभरात अंपायरिंगचा मान मिळाला. अलीम दार पुढे म्हणाले की, मी जे काही साध्य केले, त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आपण एलिट पॅनल सोडले आहे, अंपायरिंग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दार म्हणाले की, मी अजूनही आंतरराष्ट्रीय पंच म्हणून कारकीर्द सुरू ठेवण्यास उत्सुक आहे. 19 वर्षांनंतर एलिट पॅनलपासून दूर जाण्याची आणि दुसऱ्याला संधी देण्याची हीच योग्य वेळ होती. ते पुढे म्हणाले की, माझा जगातील सर्व पंचांना संदेश आहे की, कठोर परिश्रम करा. शिस्त राखा आणि शिकणे कधीही थांबवू नका.

अलीम दार यांनी आयसीसी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पॅनेलवरील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही आभार मानले. दरम्यान, आयसीसीच्या एलिट पॅनलमधील पंचांची संख्या 12 करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा एड्रियन होल्डस्टॉक आणि पाकिस्तानचा अहसान रझा यांचा एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे.