सायना नेहवालचे ते 4 विक्रम, ज्याने बदलले भारतीय बॅडमिंटनचे चित्र


भारतीय बॅडमिंटनची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल आज 17 मार्च रोजी तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. सायनाच्या आगमनानंतर भारतीय बॅडमिंटनला नवी ओळख मिळाली. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या, सायनाला बाकीच्यांपेक्षा वेगळे बनवणारी तिची कामगिरी.

सायनाने तिच्या कारकिर्दीत 10 सुपरसिरीज विजेतेपदांसह 24 आंतरराष्ट्रीय जेतेपदे जिंकली आहेत. 2015 मध्ये, ती महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल ठरली आणि असे करणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली. तिच्या आधी केवळ प्रकाश पादुकोण पुरुष एकेरीत नंबर वन बनू शकले होते.

सायनाने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. सायनापूर्वी कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले नव्हते. तिच्या पदकाने भारतातील अनेक युवा खेळाडूंना या खेळात सहभागी होण्याची प्रेरणा दिली.

2009 साली सायना BWF क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होती. पुढच्या वर्षी भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या. सायनाने येथे मलेशियाची खेळाडू मु चू वोंग हिला हरवून सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू होती.

2015 मध्ये सायनाने आणखी एक इतिहास रचला. तिने यंदाच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत तिला स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून पराभव पत्करावा लागला, पण तिचे रौप्य पदकही इतिहास रचण्यासाठी पुरेसे होते. या चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली.