कोहलीची 8 वेळा शिकार, ऑस्ट्रेलियाची 5 ‘शस्त्रे’ भारतासाठी सर्वात मोठा धोका


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरू होणार आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या तयारीची कसोटी पाहण्याचीही भारताला संधी आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या पहिल्या वनडेत संघाचे नेतृत्व करेल. अशा परिस्थितीत पांड्या ऑस्ट्रेलियाच्या 5 धोक्यांशी कसा सामना करतो, हे पाहणे रंजक ठरेल. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाची 5 शस्त्रे भारताची डोकेदुखी वाढवू शकतात आणि या शस्त्रांची नावे आहेत स्टीव्ह स्मिथ, अॅडम झाम्पा, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून ग्रीन, हे 5 खेळाडू भारताची कसोटी पाहतील.

विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने 186 धावांची मोठी खेळी खेळली होती, पण आता वनडेत त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी त्याच्यासमोर उभा आहे.

अॅडम झाम्पा हा विराट कोहलीचा सर्वात मोठा विरोधक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाम्पाने कोहलीला सर्वाधिक 8 वेळा बाद केले. वनडेमध्ये 5 वेळा आणि टी-20मध्ये 3 वेळा कोहलीची शिकार केली आहे. आता कोहली झाम्पापासून कसा सुटका करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत, स्टीव्ह स्मिथ जबाबदारी घेत आहे आणि स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. इंदूर कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली. स्मिथने 2017 मध्ये भारतात ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचे नेतृत्व केले.

डेव्हिड वॉर्नर हेही या मालिकेत भारताचे मोठे आव्हान आहे. त्याने भारतात 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 55.85 च्या सरासरीने 391 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा थोडा कमी 96.67 वर होता. भारताविरुद्ध 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. इतकंच नाही तर ज्या संघाविरुद्ध त्याने सर्वाधिक चौकार आणि षटकार मारले, त्यापैकी एक भारत आहे.

अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने भारताविरुद्ध केवळ एक वनडे खेळली आहे, पण इतर फॉरमॅटमध्ये भारताविरुद्धचा त्याचा विक्रम पाहता, तो या मालिकेतही भारताला टेन्शन देणार आहे. त्याने भारताविरुद्ध 10 सामने खेळले, ज्यात त्याने 510 धावा केल्या. त्याला फक्त 1 विकेट मिळाली, पण त्याने 8 झेल घेत अप्रतिम क्षेत्ररक्षक असल्याचे सिद्ध केले. गतवर्षीच हैदराबादमध्ये भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यात त्याने गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि 19 चेंडूत अर्धशतक ठोकले.

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला रोखणेही भारतासाठी आव्हान असेल. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. अहमदाबाद कसोटीत त्याने 95 धावांची खेळी केली होती. तत्पूर्वी, इंदूर कसोटीत त्याने क्रीजवर राहून नाबाद 49 धावा फटकावून संघाला विजय मिळवून दिला. त्याने भारताविरुद्ध 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 119 धावा केल्या आहेत आणि हे पाचही सामने तो फक्त भारतातच खेळला आहे.