दिल्ली कॅपिटल्सला महिला प्रीमियर लीग (WPL) प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, कारण गुजराज जायंट्सने एका रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 11 धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेच्या प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या, कर्णधार स्नेह राणाच्या गुजरातने खडतर स्पर्धा आणि चढ-उतारात शेवटपर्यंत हिंमत हारली नाही आणि स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. गुजरातच्या विजयाची स्टार विश्वविजेता अष्टपैलू अॅशले गार्डनर ठरली, जिने WPL मध्ये प्रथम फलंदाजी आणि नंतर चेंडूने सर्वोत्तम कामगिरी केली.
DC vs GG WPL : विश्वविजेत्या खेळाडूने गुजरातला मिळवून दिला एकहाती विजय
गुरुवार, 16 मार्च रोजी डब्ल्यूपीएलच्या 14 व्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि अवघ्या 136 धावांत आटोपला. दिल्लीचा 6 सामन्यांमधला हा दुसरा पराभव असून तरीही ती पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना एका बाजूने कसा वळला, जाणून घेऊयात…
दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकातच सलामीवीर सोफिया डंकलेला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवून मॅरिजन कॅपने शानदार सुरुवात केली.
लॉरा वुलफार्ट आणि हरलीन देओल (31) यांच्यात 49 धावांची भागीदारी झाली, पण तिचा वेग खूपच कमी होता आणि 10 व्या षटकापर्यंत धावसंख्या 2 गडी बाद 53 अशी होती.
गेल्या महिन्यात T20 विश्वचषकात टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ऍशले गार्डनरने WPL मधील तिची सर्वोत्तम खेळी खेळताना केवळ 33 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. त्याच वेळी वुलफार्टने (57 धावा, 45 चेंडू) देखील नंतर वेग पकडला आणि गार्डनरसोबत 81 धावांची भागीदारी केली.
दिल्लीने दुसऱ्याच षटकात शेफाली वर्माची विकेटही गमावली, पण अॅलिस कॅप्सी (22) आणि कर्णधार मेग लॅनिंग (18) यांनी सहाव्या षटकातच धावसंख्या 48 धावांपर्यंत नेली. कॅप्सी, लॅनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्ज हे सहाव्या आणि सातव्या षटकात बाद झाले.
मारिजन कॅपने (36) डाव सांभाळला आणि संघाची धावसंख्या सुरू ठेवली, पण दुसऱ्या बाजूने विकेट पडत राहिल्या. 14.3 षटकापर्यंत धावसंख्या फक्त 100 धावा होती आणि 8 विकेट पडल्या होत्या.
त्यानंतर अरुंधती रेड्डी (25) हिने धडाकेबाज खेळी खेळली आणि 18व्या षटकापर्यंत 135 धावांपर्यंत मजल मारून संघाला विजयाची आशा दाखवली पण ती शेवटच्या चेंडूवर बाद झाली. त्यानंतर पुढच्याच षटकात शेवटची विकेटही पडली. गुजराततर्फे गार्डनरने 3.4 षटकांत केवळ 19 धावा देत 2 बळी घेतले.