अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने मोठा धक्का बसला. अय्यरला पाठीला दुखापत झाली होती आणि त्यामुळेच तो या सामन्यात फलंदाजीसाठी आला नव्हता. यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही बाहेर पडला. आता प्रश्न असा आहे की एकदिवसीय मालिकेत अय्यरची जागा कोण घेणार? यामध्ये एक नाव खूप वेगाने पुढे येत आहे आणि ते नाव आहे विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसन अय्यरची जागा घेऊ शकतो, परंतु अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
IND vs AUS : श्रेयस अय्यर बाहेर झाल्यामुळे संजू सॅमसनला मिळणार का टीम इंडियात संधी?
अय्यरची दुखापत इतकी खोल आहे की तो आयपीएलमधूनही बाहेर जाऊ शकतो. या लीगमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो आणि संघाचा कर्णधारही आहे. अय्यरच्या दुखापतीमुळे कोलकात्यालाही मोठा धक्का बसला आहे.आता अय्यरच्या जागी कर्णधार कोण असेल हा प्रश्न फ्रँचायजीसमोर आहे.
जेव्हा अय्यर एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाल्याची बातमी समोर आली, तेव्हा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले की, संजू सॅमसन वनडे मालिकेत त्याची जागा घेऊ शकतो. मात्र अद्याप बीसीसीआयने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. दुसरीकडे, इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेसच्या वेबसाइटवर 14 मार्च रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ निवड समिती वनडे मालिकेसाठी अय्यरच्या बदलीची घोषणा करणार नाही. आता यावर बीसीसीआय अधिकृतपणे काय बोलते हे पाहावे लागेल.
न्यूझीलंड दौऱ्यानंतर सॅमसनला वनडे संघ सोडावा लागला होता. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याची निवड झाली होती, पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो या मालिकेतूनही बाहेर पडला होता. तेव्हापासून तो पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसून हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. मात्र, पुढील दोन सामन्यांसाठी रोहित पुनरागमन करेल आणि त्यानंतर तो संघाचे नेतृत्व करेल. अय्यरच्या बाहेर पडल्यानंतर आता सूर्यकुमार यादव प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळविण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.