श्रेयस अय्यर आयपीएलमधून होणार बाहेर? रोहित शर्माने दिली प्रकृतीबाबत अपडेट


नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. या सामन्यादरम्यानच भारत आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पण या सामन्यात टीम इंडियालाही एक वाईट बातमी मिळाली आहे. संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला असून तो एकदिवसीय मालिकेतही खेळणार नाही. आता अय्यर कधी परतणार हा प्रश्न आहे. सामन्यानंतर रोहित शर्माने याबाबत खुलासा केला.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने सांगितले की, पाठीच्या खालच्या भागात दुखत असल्याने अय्यर सध्या चांगल्या स्थितीत दिसत नाही. रोहितने मात्र अय्यर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कधी परतणार हे स्पष्ट केले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अय्यरचे खेळणे साशंक आहे. तसेच त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यावरही शंका आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात अय्यर टीम इंडियाचा भाग होता, पण त्याला फलंदाजीसाठी उतरता आले नाही. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहितला अय्यरच्या फिटनेसबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, त्याच्यासोबत जे घडले ते दुर्दैवी आहे. त्याला फलंदाजीसाठी दिवसभर थांबावे लागले आणि नंतर दिवसाचा खेळ संपला, तेव्हा त्याच्या पाठीचा त्रास पुन्हा वाढला. त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. स्कॅनचा नेमका अहवाल मला माहीत नाही, पण त्याची प्रकृती ठीक नसल्याचे दिसते.

भारतीय कर्णधार म्हणाला की अय्यरला पुन्हा मॅच फिट होण्यासाठी किती वेळ लागेल हे माहित नाही. रोहित म्हणाला, त्याला बरे व्हायला किती वेळ लागेल किंवा तो कधी परत येईल हे आम्हाला माहीत नाही. त्याची दुखापत समोर आली, तेव्हा त्याची प्रकृती चांगली असल्याचे दिसत नव्हते. मला आशा आहे की तो लवकरच बरा होईल आणि पुन्हा खेळायला सुरुवात करेल.