IND vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी, पॅट कमिन्स आता वनडे मालिकेतूनही बाहेर, जाणून घ्या का?


भारताविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियासाठी ही बातमी चांगली नाही. दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आता भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. तो एकदिवसीय मालिकेसाठी भारतात परतणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले.

पॅट कमिन्सला त्याच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे ऑस्ट्रेलियाला परतावे लागले होते, त्यानंतर तो परतला नाही. वास्तविक, गेल्या आठवड्यात त्याच्या आईचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले होते. त्याच वैयक्तिक कारणांमुळे कमिन्स क्रिकेटपासून दूर आहे.

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकली आणि त्यानंतर WTC फायनलचे तिकीट मिळाले. आता स्मिथसमोर वनडे मालिका जिंकण्याची जबाबदारी आहे.

अॅरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचे वनडे कर्णधारपद स्वीकारले. आतापर्यंत त्याने केवळ 2 वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. यानंतर दुसरा सामना 19 मार्चला होणार आहे. त्याच वेळी, वनडे मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च रोजी खेळवला जाईल.