श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का, शोधावा लागणार नवा कर्णधार!


श्रेयस अय्यरच्या दुखापतीने टीम इंडियाला धक्का बसला असला तरी त्याचा दुष्परिणाम कोलकाता नाईट रायडर्सवरही होणार आहे. अहमदाबाद कसोटीदरम्यान श्रेयस अय्यरच्या पाठीला दुखापत झाली होती. यानंतर तो कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी उतरू शकला नाही आणि त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही बाहेर पडला. आता असे मानले जात आहे की हा खेळाडू आयपीएल 2023 च्या पूर्वार्धातूनही बाहेर असेल.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यर आयपीएलच्या पूर्वार्धात खेळू शकणार नाही. अय्यर सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच त्याला बंगळुरूला पाठवण्यात आले.

श्रेयस अय्यर अहमदाबाद कसोटीत दोन दिवस फिल्डिंग करत होता आणि त्यानंतर त्याच्या पाठीच्या खालच्या भागात सूज आली होती. कर्णधार रोहित शर्मानेही हावभावात सांगितले की, अय्यरची दुखापत किरकोळ नाही. म्हणजेच तो लवकरच क्रिकेटच्या मैदानात परतताना दिसत नाही.

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. तसे, संघात आंद्रे रसेल, शाकिब अल हसन आणि नितीश राणासारखे खेळाडू आहेत जे संघाचे नेतृत्व करू शकतात.

आता जर श्रेयस अय्यर आयपीएल 2023 च्या पूर्वार्धापर्यंत तंदुरुस्त नसेल, तर याचा अर्थ कोलकाता नाईट रायडर्सला नवा कर्णधार शोधावा लागेल. अय्यरने गेल्या वर्षीच कोलकाता नाईट रायडर्सची कमान सांभाळली होती.