भारताने सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 2-1 ने जिंकली बॉर्डर-गावस्कर मालिका


जगातील नंबर 1 कसोटी संघाला हरवणे इतके सोपे नाही, पण जेव्हा टीम इंडिया समोर असते, तेव्हा क्रमवारीत फरक पडत नाही. टीम इंडियाने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत पराभव केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळली जात असलेली चौथी कसोटी अनिर्णित राहिली आणि यासह रोहित अँड कंपनीने कसोटी मालिका जिंकली. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका भारताने 2-1 अशी जिंकली. नागपूर आणि दिल्लीत संघ जिंकला आणि इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत सलग चौथ्यांदा पराभव केला आहे. 2017 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर 2-1 असा पराभव केला होता. यानंतर टीम इंडियाने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-1 ने पराभूत केले आणि आता पुन्हा एकदा भारताने त्यांच्या घरच्या मैदानावर 2-1 ने मालिका जिंकली आहे.

अहमदाबाद कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने चोख प्रत्युत्तर देत 571 धावा करत 91 धावांची आघाडी मिळवली. सलामीवीर शुभमन गिलने 128 आणि विराट कोहलीने शानदार 186 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 175 धावा केल्या आणि यासह कसोटी सामना अनिर्णित राहिला.

तसे, अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्याने टीम इंडियाचे कोणतेही नुकसान झाले नाही कारण भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलिया आधीच पात्र ठरला होता, पण टीम इंडियाला श्रीलंकेच्या पराभवानंतर फायनलचं तिकीट मिळालं. क्राइस्टचर्चमध्ये श्रीलंकेचा संघ पराभूत झाला आणि यासह भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही निश्चित झाला.

विराट कोहली अहमदाबाद कसोटीचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. विराट कोहलीने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. त्याच्या बॅटमधून 186 धावा निघाल्या. विराट कोहलीने 1205 दिवसांनी कसोटीत शतक झळकावले होते. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या पार केली आणि आघाडीही घेतली.