आता रेल्वेत नेता येईल फक्त एवढेच सामान, वजन जास्त असेल तर टीसी कापणार चलान


भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधांची विशेष काळजी घेते. प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कोणत्याही समस्येपासून दूर राहावे, यासाठी रेल्वे वेळोवेळी नवनवीन सेवा आणत असते. त्यासाठी रेल्वे त्यांना सल्लेही देत ​​असते. पण, तुम्हाला माहित आहे का, फ्लाइटप्रमाणे तुम्ही ट्रेनमध्ये एका ठराविक मर्यादेपर्यंतच सामान घेऊन जाऊ शकता? नाही ना? आम्ही तुम्हाला सांगतो की, लांबच्या प्रवासात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमध्ये जास्त सामान नेण्याची परवानगी नाही. त्यासाठी रेल्वेची वजन मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कारण जास्तीच्या सामानामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ट्रेनमध्ये तुम्ही किती सामान घेऊन जाऊ शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

जर काही कारणास्तव प्रवाशाला जास्त सामान घेऊन जावे लागले, तर त्यासाठी रेल्वे त्याला पार्सल ऑफिसमध्ये जाऊन सामान बुक करण्याची सूचना देते. अनेक प्रवासी जास्त सामान घेऊन प्रवास करताना दिसतात. यामुळे ते स्वतः अस्वस्थ होतातच, सोबतच त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांना त्रास होतो. हे लक्षात घेऊन रेल्वेने प्रत्येक डब्यात सामानाची मर्यादा निश्चित केली आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेनच्या डब्यात प्रवासी 40 ते 70 किलो वजनाचे सामान ठेवू शकतात. तुम्ही अतिरिक्त पैसे खर्च न करता स्लीपर क्लासमध्ये 40 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकता. तर, तुम्ही सेकंड एसीमध्ये 50 किलोपर्यंत आणि फर्स्ट क्लास एसीमध्ये 70 किलोपर्यंतचे सामान वाहून नेऊ शकता. तुम्ही जादा पैसे देऊन ते 80 किलो देखील करू शकता.

प्रवासादरम्यान कोणताही प्रवासी नियमभंग करताना आढळून आल्यास त्याला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. त्याच वेळी, प्रवासी स्वतःसाठी 109 रुपयांमध्ये लगेज व्हॅन बुक करू शकतात.