बाबर आझमच्या माथी 482 धावांचा ‘कलंक’, जगासमोर झाली नाचक्की


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या माथी 482 धावांचा कलंक लागला आहे. खरं तर, बाबर सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मीचे नेतृत्व करत आहे आणि पेशावरने मागील दोन्ही सामने गमावले आहेत. तेही 240 आणि 242 धावा करूनही, म्हणजेच एकूण 482 धावांचा डोंगर बाबरच्या डोक्यावर बसला आहे. मोठे लक्ष्य देऊनही बाबरच्या संघाला ते वाचवण्यात अपयश आले. गेल्या दोन सामन्यात बाबरच्या गोलंदाजांनी जोरदार मुसंडी मारली. आता गोलंदाजीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

लीगच्या 27व्या सामन्यात पेशावरने मुलतान सुलतान्सविरुद्ध फलंदाजी करताना 6 गडी गमावत 242 धावा केल्या. सायम अय्युबने 33 चेंडूत 58 धावा ठोकल्या. तर कर्णधार बाबरने 39 चेंडूत 73 धावा केल्या. मोहम्मद हॅरिसने 11 चेंडूत 35 धावा, टॉम कोहलर कॅडमोरने 18 चेंडूत 38 धावा केल्या.

पेशावरच्या फलंदाजांनी खळबळ उडवून दिली, पण त्यांचे गोलंदाज वाईटरित्या फ्लॉप झाले आणि त्यांची धावसंख्या वाचवू शकले नाहीत. पेशावरच्या गोलंदाजांनी आपल्याच संघाच्या फलंदाजांची मेहनत उद्ध्वस्त केली. त्यांनी बिनधास्त धावा लुटल्या. पेशावरच्या गोलंदाजांनी मुलतानचे काम सोपे केले. मुलतानच्या रिले रुसोने 51 चेंडूत 121 धावा आणि केएन पोलार्डने 25 चेंडूत 52 धावा केल्या.

मुलतानने 243 धावांचे लक्ष्य पहिल्या 5 चेंडूत 6 गडी गमावून पूर्ण केले. पेशावरने 243 धावांचे लक्ष्य दिले, तरीही संघाचा पराभव झाला. गेल्या सामन्यात पेशावरने क्वेटा ग्लॅडिएटर्सला 241 धावांचे लक्ष्य दिले होते, तरीही त्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या सामन्यात बाबरने 65 चेंडूत 115 धावा, रोवमन पॉवेलने 18 चेंडूत 35 धावा केल्या. प्रत्युत्तरात क्वेटाचा सलामीवीर जेसन रॉयने 63 चेंडूत 145 धावा केल्या. जेसन रॉयने 20 चौकार मारले. पीएसएलमधील मागील दोन्ही सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या करूनही बाबरचा संघ धावसंख्या वाचवू शकला नाही.