IND vs AUS : पॅट कमिन्सच्या आईचे निधन, काळी पट्टी बांधून मैदानात उतरला ऑस्ट्रेलियन संघ


भारताचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे निधन झाले आहे. ती बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. कमिन्स आपली आई मारियासोबत वेळ घालवण्यासाठी दिल्ली कसोटीनंतर मायदेशी परतला. मारियाला श्रद्धांजली वाहण्यासाठी, ऑस्ट्रेलिया संघ भारत विरुद्ध अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी काळी पट्टी बांधून मैदानावर उतरला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही कमिन्सच्या आईची बातमी देताना शोक व्यक्त केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले की, मारिया कमिन्सच्या निधनाने आम्ही सर्व दु:खी आहोत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या वतीने, आम्ही कमिन्स आणि त्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियाचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे.

कमिन्सच्या आईला 2005 मध्ये पहिल्यांदा स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. गेल्या काही आठवड्यांपासून ती एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. बीसीसीआयनेही शोक व्यक्त केला आणि सांगितले की, या कठीण काळात आमच्या संवेदना कमिन्स आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.