गुजरातमधील दोन तरुण मध्यरात्री घुसले शाहरुख खानच्या घरात, आता खळबळजनक खुलासा


गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी शाहरुख खानचे घर असलेल्या ‘मन्नत’मध्ये घुसल्याप्रकरणी दोघांना अटक केल्याची बातमी आली होती. ही बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कडेकोट बंदोबस्तात असलेल्या शाहरुखच्या घरात दोन जण कसे घुसले? आत जाणारे कोण होते? आणि ते कसे पकडले गेले? हा प्रश्न सर्वांच्याच मनात घुमत होता. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे.

अटक करण्यात आलेले दोघे गुजरातमधील भरूचचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शाहरुख खानला भेटण्यासाठी ते गुजरातहून मुंबईत आले होते आणि मध्यरात्री किंग खानच्या घरात घुसल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्समध्ये गणल्या जाणाऱ्या किंग खानच्या घरात प्रवेश करण्याच्या या घटनेने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

मुंबई पोलिसांच्या तपासात मन्नतमध्ये चोर पावलाने घुसलेल्या मुलांचे वय 20 ते 22 वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाचे नाव पठाण साहिल सलीम खान आणि दुसऱ्याचे नाव राम सराफ कुशवाह आहे. दोघेही शाहरुखचे चाहते असल्याचा दावा करतात. या दोघांची क्रेझ पाहून शाहरुखच्या दिवाना चित्रपटातील गाणे आठवते, ज्याचे बोल आहेत ‘ऐसी दीवांगी… देखी नहीं कही, मैने…’.

आपल्या नायकाला भेटण्यासाठी दोन्ही मुलांनी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास मन्नतच्या बाहेरील भिंतीवरुन उडी मारली. त्यानंतर ते मन्नतच्या तिसऱ्या मजल्यावर शाहरुख खानच्या मेकअप रूममध्ये गेले आणि तिथे किंग खानची वाट पाहू लागले. जवळपास 8 तास दोघांनी वाट पाहिली. मात्र शाहरुखच्या आधी या दोघांची शाहरुखच्या घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीशी भेट झाली आणि ते पकडले गेले.

मन्नतचे व्यवस्थापक कॉलिन डिसोझा यांनी मुंबई पोलिसांना सांगितले की, सकाळी 11 वाजता त्यांना सुरक्षा रक्षकाचा फोन आला, ज्याने त्यांना सांगितले की दोन लोक घरात घुसले आहेत. एफआयआरनुसार, दोन्ही मुलांना सतीश, मन्नतच्या कर्मचाऱ्याने पाहिले होते.

सतीशने त्यांना मेकअप रूममध्ये पाहिले आणि नंतर पठाण आणि राम दोघांनाही बाहेर लॉबीमध्ये आणले. त्यामुळेच शाहरुख खानची नजर घरातील दोन अनोळखी लोकांवर पडली आणि तो आश्चर्यचकित झाला. यानंतर मन्नतच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले आणि दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी घरात चोरट्यांसह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.