आता ऑस्ट्रेलियातही ग्राह्य धरली जाणार भारतातील पदवी, जाणून घ्या कोणाला होणार फायदा?


गूड न्युज…! तुम्ही भारतातील विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर पदवी घेतली असली आणि त्यानंतर तुमचा ऑस्ट्रेलियाला जाण्याचा प्लॅन आहे. तिथे जाऊन काहीतरी काम करायचे आहे. त्याचबरोबर तिथे त्यामुळे वेगळा कोर्स करण्याची गरज भासणार नाही. कारण आता भारतीय विद्यापीठातून घेतलेली UG, PG पदवी ऑस्ट्रेलियातही वैध असेल. यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात करार करण्यात आला आहे. या अंतर्गत भारतीय व्यावसायिकांना ऑस्ट्रेलियात नोकरी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

गुरुवारी दोन्ही देशांनी शैक्षणिक पात्रतेला परस्पर मान्यता देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत भारताची पदवी ऑस्ट्रेलियात वैध नव्हती. या करारानुसार ऑस्ट्रेलियाची पदवी भारतातही वैध असेल. दोन्ही देश एकमेकांची पदवी ओळखतील. मात्र अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कायद्याची पदवी घेतलेल्या व्यावसायिकांना सध्या ही सुविधा मिळणार नाही.

अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कायदा वगळता इतर सर्व यूजी आणि पीजी पदवी अभ्यासक्रमांना या कराराचा लाभ मिळणार आहे. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे तुमची पदवी UGC मान्यताप्राप्त संस्थेतून असावी. मात्र, यासंदर्भात सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही.

UGC चे अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले, भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत सुधारणा कशा राबवल्या जात आहेत याबद्दल आम्ही सविस्तर चर्चा केली. आम्ही भारतातील परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसवरील UGC च्या मसुद्याच्या नियमांवरही चर्चा केली. आम्ही सहमत झालो की हे नियम भारत आणि ऑस्ट्रेलियाला एकत्र काम करण्याची उत्तम संधी देतात.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भारत दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांच्या भेटीनंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांमध्ये किमान 11 करार झाले आहेत. या अंतर्गत अनेक प्रमुख क्षेत्रात दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य वाचले जाईल. यामध्ये संशोधन आणि शैक्षणिक यांचा समावेश आहे.

दरम्यान, क्लेअर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह 30 सदस्यीय पथकाने येथील विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) भेट दिली. या भेटीत 10 हून अधिक ऑस्ट्रेलियन विद्यापीठांचे कुलगुरू आणि इतर उच्च शिक्षण अधिकारी सहभागी झाले होते.