महागाईचा भडका! एलपीजीच्या दरात वाढ, आता 1103 रुपयांना मिळणार सिलेंडर


महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. दैनंदिन वस्तुंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून आता एलपीजी सिलेंडर 1103 रुपयांचा झाला आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली आहे. या वाढीमुळे दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2119.50 रुपये होईल. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. स्थानिक करांमुळे घरगुती एलपीजीच्या किमती राज्यानुसार भिन्न असतात. इंधन किरकोळ विक्रेते दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडरच्या किमती सुधारतात.

यापूर्वी, ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या दिवशी LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. त्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती. मात्र, घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सिलेंडरचे दर वाढवल्यानंतर रेस्टॉरंट, हॉटेल्स आदी खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. त्याचबरोबर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही बदल झाल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवरही परिणाम होणार आहे.

ओएमसीने गेल्या वर्षी 6 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमती वाढवल्या होत्या. सिलेंडरच्या दरात 153.5 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी चार वेळा दरात वाढ करण्यात आली होती. OMC ने मार्च 2022 मध्ये प्रथम 50 रुपयांनी, पुन्हा 50 रुपयांनी आणि मे मध्ये 3.50 रुपयांनी वाढ केली. यानंतर जुलैमध्ये घरगुती सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.