टीम इंडिया-मुंबई इंडियन्सला एकत्र धक्का, जसप्रीत बुमराहबाबत खूप वाईट बातमी


गेल्या एक वर्षापासून आपल्या अनेक खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या भारतीय क्रिकेट संघाची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. केवळ टीम इंडियाच नाही तर आयपीएल 2023 चा सीझन सुरू होण्याआधी पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे टेंशनही वाढणार आहे. या तणावाचे कारण आहे, जसप्रीत बुमराह. टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या 7 महिन्यांपासून त्याच्या तंदुरुस्तीशी झुंजत आहे आणि आगामी काळासाठी कोणतीही चांगली चिन्हे नाहीत.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर मैदानात परतण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्येमुळे त्रासलेला, बुमराह अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांचा असा विश्वास आहे की बुमराहला आयपीएल 2023 हंगामात खेळणे कठीण जाणार आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर बुमराहला पाठीचा त्रास झाला होता, त्यामुळे तो आशिया कपमध्येही खेळू शकला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत त्याने पुनरागमन केले पण परतण्याचा हा निर्णय घाईघाईने घेण्यात आला होता, कारण तो फक्त दोनच सामन्यांनंतर पुन्हा दुखापतग्रस्त झाला होता आणि 2022 च्या T20 विश्वचषकातही तो खेळू शकला नाही.

त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा समावेश करण्यात आला, परंतु मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्याला संघातून वगळण्यात आले. यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही आणि संपूर्ण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याची निवड झाली नाही.

या सगळ्यानंतर, 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2023 सीझनसाठी बुमराह त्याच्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीसह परतेल, असे सर्वजण गृहीत धरत होते, पण आता याला ग्रहण लागलेले दिसते आहे. केवळ आयपीएलच नाही तर जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही त्याचे पुनरागमन अवघड दिसत आहे, ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

बुमराह गेल्या अनेक आठवड्यांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये त्याच्या दुखापतीच्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे, जिथे सर्व काही आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे झाले नाही. बुमराह यापूर्वी एनसीएमधील सराव सामन्यांमध्येही गोलंदाजी करताना दिसला होता. अहवालानुसार, बीसीसीआय, टीम इंडिया व्यवस्थापन आणि एनसीएचे लक्ष्य आता बुमराहला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयार करणे आहे. भले त्याला आयपीएल, डब्ल्यूटीसी फायनल आणि आशिया कपमधून बाहेर बसावे लागले.