प्रशिक्षकाच्या घरात आसरा, वजनामुळे संघाबाहेर, मग कसा ‘लॉर्ड’ झाला शार्दुल ठाकूर


शार्दुल ठाकूर हा अलीकडच्या काळात भारतीय संघाचा जीव बनला आहे. तो बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. स्वबळावर त्याने भारताला अनेक सामने जिंकून दिले. शार्दुलने अनेक वेळा चमत्कार दाखवले, त्यामुळेच तो संघात लॉर्ड म्हणूनही प्रसिद्ध आहे. सध्या तो मैदानापासून दूर आहे. शार्दुल त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. आज तो मिताली परुलकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

शार्दुल हे आज भारतीय क्रिकेटचे मोठे नाव बनले आहे, पण एक काळ असा होता जेव्हा त्याला भारतासाठी खेळणे कठीण होते. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. एके दिवशी चाहते आणि सहकारी खेळाडू त्याला लॉर्ड शार्दुल म्हणतील याचा त्यानेही कधी विचार केला नव्हता.

मुंबईपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पालघरमध्ये राहणारा शार्दुल लहानपणी सरावासाठी दररोज साडेतीन तासांचा प्रवास करत मुंबईला जायचा. त्याचा दिवस पहाटे साडेतीन वाजता सुरू व्हायचा. त्यानंतर तो त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या घरी राहू लागला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात शार्दुलचे वजन खूप वाढले होते. जास्त वजनामुळे त्याला मुंबईच्या अंडर-19 संघातूनही वगळण्यात आले होते. नोव्हेंबर 2012 मध्ये, त्याने मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्या सामन्यात त्याने 82 धावांत एक विकेट घेतली, परंतु त्यावेळी त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या वजनाची जास्त चर्चा झाली.

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शार्दुलचे वजन सुमारे 83 किलो होते. सचिन तेंडुलकरनेही त्याला सांगितले होते की, जर तो क्रिकेटबाबत गंभीर असेल तर त्याने वजन कमी करावे. पहिल्या सत्रात आपल्या वजनाबाबत बरीच टीका ऐकल्यानंतर शार्दुलने आपले वजन सुमारे 13 किलोने कमी केले आणि भारतीय क्रिकेटच्या वाढत्या वेगवान गोलंदाजांमध्ये सामील झाला. त्यानंतरच तो मुंबई रणजी संघाचा नियमित सदस्य झाला. त्याने मुंबईला रणजी चॅम्पियनही बनवले.

2017 मध्ये, शार्दुल आयपीएल फ्रँचायझी पुणे सुपर जायंट्सचा भाग बनला, त्यानंतर 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स. यानंतर शार्दुलने मागे वळून पाहिले नाही. 2017 मध्ये, त्याने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढच्याच वर्षी त्याने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले. शार्दुलने भारतासाठी 34 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 बळी आणि 298 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 8 कसोटी सामन्यात 27 बळी आणि 254 धावा आहेत, तर 25 टी-20 सामन्यात त्याने 33 बळी आणि 69 धावा केल्या आहेत.