भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या वडिलांचे निधन


भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादवला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या मध्यावर सर्वात वाईट बातमीला सामोरे जावे लागले आहे. दिर्घकाळ आजारी असलेले उमेशचे वडील टिळक यादव यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र नुकतेच त्यांना घरी आणण्यात आले. उमेशचे वडील 74 वर्षांचे होते आणि त्यांनी बुधवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. उमेश अलीकडेच टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग होता, ज्यातील पहिली कसोटी नागपुरातच खेळली गेली होती.

वृत्तानुसार, उमेशचे वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर नागपुरातच उपचार सुरू होते, मात्र काही दिवसांपूर्वी उपचाराचा परिणाम दिसून येत नसल्याने त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. उमेश सध्या आपल्या कुटुंबासोबत आहे कारण दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाला 5 दिवसांचा ब्रेक मिळाला आहे.