दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतच्या जागी निवडला नवा कर्णधार, अक्षरवरही मोठी जबाबदारी


31 मार्चपासून आयपीएल 2023 सुरू होत आहे आणि नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या नवीन कर्णधाराची निवड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेव्हिड वॉर्नर 16 व्या सत्रात दिल्लीचा कर्णधार असेल. डेव्हिड वॉर्नरने यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले आहे.

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादला चॅम्पियन बनवले होते. हैदराबादचा संघ 2016 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनला होता. या संघाने वॉर्नरला गेल्या मोसमापूर्वी संघातून सोडले असले, तरी यानंतर वॉर्नरला दिल्लीने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

डेव्हिड वॉर्नर आता दिल्ली संघाचे नेतृत्व करेल, तर अष्टपैलू अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ऋषभ पंतला रस्ते अपघातात दुखापत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला कर्णधार बदलावा लागला होता. 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दिल्ली-डेहराडून महामार्गावर ऋषभ पंतचा अपघात झाला.

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादनेही आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हैदराबादने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी केन विल्यमसन या संघाचा कर्णधार होता.