स्पॉट फिक्सिंग करणाऱ्या अजित चंडिलावर बीसीसीआय मेहरबान, पुनरागमनाचा मार्ग मोकळा


2013 च्या आयपीएल दरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला अजित चंडिला गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटपासून दूर होता. त्याच्यासोबत या प्रकरणात अडकलेले वेगवान गोलंदाज श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांचे आयुष्य पुन्हा रुळावर आले असले तरी चंडिला अजूनही क्रिकेटपासून दूर आहे. आता या फिरकीपटूवर मेहरबानी करत बीसीसीआयने त्याला मोठा दिलासा दिला आहे. चंडिलाला क्रिकेटमध्ये परतण्यासाठी बोर्डाने दरवाजे उघडले आहेत.

अंकित चव्हाण, श्रीशांत आणि अजित चंडिला हे 2013 साली राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होते. या खेळाडूंवर पैसे घेऊन खेळल्याचा आरोप होता. तिघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले. बीसीसीआयने या तिन्ही खेळाडूंवर आजीवन बंदी घातली होती. 2017 मध्ये प्रथम श्रीशांत आणि नंतर अंकितवरील आजीवन बंदी उठवण्यात आली. श्रीशांत केरळ संघात परतला, तर अंकितने मुंबईतील एका क्लबकडून खेळायला सुरुवात केली. त्याचवेळी बीसीसीआयने चंडिलालाही दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयचे लोकपाल विनीत सरन यांनी चंडिला यांच्यावरील आजीवन बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ही बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली आहे, जी 2016 पासून लागू मानली जात होती. लोकपाल सरन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘बीसीसीआयने 17.05.2013 रोजी चंडिलाला सर्व क्रिकेट क्रियाकलापांमधून निलंबित केले. अर्जदाराविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईबरोबरच, मंडळाकडून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आली होती. दिनांक 04.11.2019 रोजी अर्जदाराचे प्रतिनिधित्व स्वीकारण्यात आले आहे आणि श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांच्याशी बरोबरी करण्याचे त्यांचे अपील विचारात घेण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, बीसीसीआय शिस्तपालन समितीच्या 18.01.2016 च्या आदेशानुसार त्याच्यावर लादण्यात आलेला 7 वर्षांचा आजीवन बंदीचा कालावधी कमी करण्यात आला आहे.

यापूर्वी 2017 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील आजीवन बंदीही उठवली होती. यानंतर आता श्रीसंतने रणजी ट्रॉफी 2022 मध्ये मेघालय विरुद्ध केरळसह मैदानात उतरले. त्याचबरोबर अंकितनेही बंदी उठल्यानंतर मुंबईतील एका क्लबमधून खेळायला सुरुवात केली. आता चंडिला कोणत्या संघात आणि कुठून पुनरागमन करणार हे पाहावे लागेल.