IND vs AUS : शुभमन गिलला तिसऱ्या कसोटीत मिळणार का स्थान? केएल राहुलच्या भविष्याबद्दल हरभजनने सांगितली मोठी गोष्ट


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 1 मार्चपासून खेळवला जाणार आहे. सामन्याला अजून आठवडाभराहून अधिक कालावधी बाकी आहे, पण टीम इंडिया प्लेइंग-11 मध्ये बदल करणार की नाही, यावर बरीच चर्चा रंगली आहे. सर्वाधिक चर्चा केएल राहुलच्या फॉर्ममध्ये नसल्याची आहे. दुसऱ्या कसोटीनंतर शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची निवड झाली, तेव्हा त्याला स्थान देण्यात आले. यावेळी राहुलचा पत्ता कापले जाईल असे मानले जात होते, मात्र निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. मात्र, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला प्लेइंग-11 मधून वगळण्यात येईल, असे वाटते.

तिसऱ्या कसोटीत राहुलच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिल सलामी येईल, असा अंदाज हरभजनने व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी निवडलेल्या संघात कोणालाही उपकर्णधार बनवण्यात आलेले नाही. राहुलला संघात ठेवण्यात आले आहे, मात्र खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. अशा स्थितीत तिसऱ्या कसोटीतही प्लेइंग-11 मधून वगळले जाऊ शकते, असे हरभजनला वाटते.

जेव्हा हरभजनला एका मुलाखतीत विचारण्यात आले की राहुलला वगळले जाऊ शकते का, तेव्हा तो म्हणाला, हो, मला असे वाटते, कारण जेव्हा तुम्ही उपकर्णधार नसता, तेव्हा व्यवस्थापनासाठी तुम्हाला वगळणे सोपे होते. एकदा तुम्ही उपकर्णधार झालात की तुमची कामगिरी कोणत्या प्रकारची आहे याने काही फरक पडत नाही, त्यानंतर सामन्यात सहभागी होणाऱ्या अकरा खेळाडूंमध्ये तुमचा समावेश होतो.

हरभजन म्हणाला, केएल राहुलबाबत तुम्हाला माहीत आहे की तो एक सक्षम खेळाडू आहे. सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. तो धावा काढत नाही. मला खात्री आहे की तो फलंदाजीत चांगली कामगिरी करेल, पण त्याच्याकडे उपकर्णधारपद नसेल, तर रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामी करताना पाहायला मिळेल.