चेतेश्वर पुजाराने कारकिर्दीतील 100व्या कसोटीत केला नकोसा विक्रम


दिल्ली कसोटी सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा एकही धाव न करता बाद झाला. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना आहे. 100व्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात पुजारा 0 धावांवर बाद झाला. असे होताच त्याच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात, कारकिर्दीतील 100 व्या कसोटीत ‘शून्य’ धावांवर बाद होणारा तो जगातील 8वा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी दिलीप वेंगसरकर, अॅलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीफन फ्लेमिंग, कोर्टनी वॉल्श, ब्रेंडन मॅक्युलम आणि अॅलिस्टर कुक यांच्या नावावर असा नकोसा विक्रम झाला आहे. हा अवांछित विक्रम सर्वप्रथम भारताच्या वेंगसरकरांच्या नोंदवला गेला होता.

100व्या कसोटीत 0 धावांवर बाद झालेले खेळाडू

  • दिलीप वेंगसरकर
  • ऍलन बॉर्डर
  • मार्क टेलर
  • स्टीफन फ्लेमिंग
  • कोर्टनी वॉल्श
  • ब्रेंडन मॅक्युलम
  • अॅलिस्टर कुक
  • चेतेश्वर पुजारा

दुसरीकडे, पुजारा भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा 13वा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकरने भारत आणि जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 कसोटी सामने खेळण्याचा विश्वविक्रम केला आहे. याशिवाय कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, स्पिनर लिऑनच्या चेंडूवर पुजारा एलबीडब्ल्यू आऊट झाला. पुजाराला केवळ 7 चेंडूंचा सामना करता आला.

याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. विशेषत: शमीने आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवली होती आणि 4 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला होता. त्याचबरोबर अश्विन आणि जडेजाने 3-3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.