ब्लंडेलने रचला इतिहास, इंग्लंडला दिले त्याच्याच भाषेत उत्तर, रचला विश्वविक्रम


न्यूझीलंडचा यष्टिरक्षक-फलंदाज टॉम ब्लंडेलने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला. त्याने इंग्लिश संघाला त्याच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ब्लंडेलने इंग्लिश गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने 138 धावांची अप्रतिम खेळी खेळली. गुलाबी चेंडू कसोटीत शतक झळकावणारा ब्लंडेल हा जगातील पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. ब्लंडेलच्या या धडाकेबाज खेळीमुळे न्यूझीलंड संघाने 83 धावांवरून 306 धावांपर्यंत मजल मारली.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने 9 बाद 325 धावा करून पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात किवी संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यांनी 83 धावांत 5 विकेट गमावल्या. टॉम लॅथम, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, नील वॅगनर, डॅरेल मिशेल स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले.

यानंतर ब्लंडेलने डेव्हॉन कॉनवेसह इंग्लंडला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत वेगवान धावा जोडल्या. त्याने 181 चेंडूत 138 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने कारकिर्दीतील चौथे कसोटी शतक झळकावले. ब्लंडेलने 19 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचवेळी कॉनवेने 77 धावा फटकावल्या.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 98 धावांची आघाडी मिळवली आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 बाद 79 धावा केल्या आहेत. बेन डकेट आणि जॅक क्रॉलीच्या रूपाने इंग्लिश संघाला दोन धक्के बसले आहेत. ओली पोप 14 धावांवर तर स्टुअर्ट ब्रॉड 6 धावा करून क्रीजवर आहे.